भिवापूर : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर असताना ऐन पोळ्याच्या दिवशी पुन्हा अख्खे गाव अंधारात बुडाले. त्यामुळे ग्रामस्थांनी विद्युत उपकेंद्रात मुक्काम ठोकला. कोरोनाच्या सावटात गावात बैलांचा पोळा भरला नसला तरी जवळी विद्युत उपकेंद्रात मात्र सोमवारी मध्यरात्री अंधार यातनांचा पोळा भरला.
जवळी हे तालुक्यातील मोठे गाव आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून येथील नागरिक वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे बेजार आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा तक्रारी सुध्दा केल्या. आमदार राजू पारवे यांच्या आढावा बैठकीतही वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याचा आक्रमक सूर आळवला गेला. मात्र, त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. अशातच सोमवारी ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर मोठ्या उत्साहात पोळा साजरा करीत असताना रात्री ९ वाजता संपूर्ण जवळी गावातील ‘बत्तीगुल’ झाली. ग्रामस्थांनी लाईनमनला फोन केला. मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तास दोन तास होऊनही लाईट येत नसल्यामुळे संतापलेले ग्रामस्थ एकवटले. सरपंच अरविंद चौधरी यांच्यासह महिला, पुरूष व तरुण मंडळी गावात लगतच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पोहोचले. तेथेच त्यांनी मुक्काम ठोकला. मध्यरात्री २.३० वाजता विद्युत पुरवठा सुरू होताच ग्रामस्थांनी घराचा रस्ता धरला. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
सहायक अभियंता गेले कुठे?
महावितरणच्या जवळी परिसराची जबाबदारी सहायक अभियंता बी. एस. नाईक यांच्याकडे आहे. मात्र, वरिष्ठांना कुठलीही कल्पना न देता गत दोन महिन्यांपासून ते गायब आहेत. याच कारणामुळे त्यांचे वेतनही थांबविल्याचे कळते. मात्र, सहायक अभियंता कर्तव्यावर नसल्यामुळे जवळीवासीयांना अंधारयातना सोसाव्या लागत आहेत.
070921\1825-img-20210906-wa0153.jpg
जवळी विद्यूत उपकेंद्रात मध्यराञी पर्यंत महिला व पुरूष मंडळी असे मुक्कामी होते.