नागपूर : लॉकडाऊनमध्ये गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यत्वे किराणा दुकानात सकाळी ९ ते ११ या वेळात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे इतवारी व मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने दुपारी आणि चिल्लर किराणा दुकाने दिवसातून दोनदा सुरू ठेवण्याची मागणी नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने प्रशासनाकडे केली आहे.
सध्या ग्राहकांची सर्वाधिक गर्दी ठोक आणि किरकोळ किराणा दुकानात होत आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत ग्राहक येत नाहीत, पण ९ नंतर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता वाढली आहे. गर्दीमुळे दुकानदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी इतवारी व मस्कासाथ ठोक किराणा बाजार सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत आणि किरकोळ किराणा दुकाने सकाळ आणि सायंकाळी सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, ठोक किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू असल्याने किरकोळ दुकानदारांना माल खरेदी करण्यासाठी वेळ मिळत नाही. सकाळी ग्राहकांची गर्दी होत असल्याने दुकानदारांना किराणा मालाची खरेदी करता येत नाही. त्यामुळे अनेक मालाचा तुटवडा होत आहे. ठोक दुकाने दुपारी सुरू राहिल्यास किरकोळ दुकानदारांना खरेदीसाठी वेळ मिळेल. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण येईल. याशिवाय गरीब आणि मजूर वर्ग सकाळी कामावर जात असल्याने ते आवश्यक वस्तू खरेदी करू शकत नाही. सायंकाळी त्यांना खरेदीसाठी सुविधा होईल तसेच काळ्याबाजारावर नियंत्रण येईल.
ठोक आणि किरकोळ किराणा दुकानदारांची वेळ एकच असल्याने किरकोळ दुकानदारांना अनेक अडचणी येत आहेत. वेळेच्या बंधनामुळे अनेक वस्तू संपल्यानंतरही खरेदी करणे शक्य नसते. कोरोना काळात वस्त्यांमधील नागरिक जवळच्या दुकानांवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रशासनाने ठोक आणि किरकोळ दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळांमध्ये बदल करण्याचा तातडीने निर्णय घ्यावा.