नागपूर : संपूर्ण देशात बंदी असलेल्या मांगूर माशांनी भरलेला ट्रक शनिवारी साेलापूरनजीक उलटला आणि नागरिकांनी मासे गाेळा करण्यासाठी घटनास्थळावर एकच गर्दी केली हाेती. विशेष म्हणजे हा कर्नाटकहून नागपूरला येत हाेता. मात्र या माशांवर बंदी असूनही ट्रकभर मासे नागपूरला का येत हाेते, हा संशयाचा विषय असून, याबाबत सखाेल चाैकशी केली जावी, असे मत मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
मांगूर हा मासा मानवी आराेग्यास हानिकारक असून, कॅन्सर हाेण्याचीही शक्यता असल्याने केंद्र शासनाने त्याचे मत्स्यपालन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र बंदी असूनही ताे सर्रासपणे विकला जाताे, हे उघड आहे. नागपूरला येणारा मांगूर मासे भरलेला ट्रक साेलापूरला उलटल्यामुळे ही चाेरी उघड झाली असेच म्हणावे लागेल. मात्र हा ट्रक काेणत्या मासे व्यावसायिकाने मागविला, ताे कशासाठी मागविला, कर्नाटकमधील या माशांचे पुरवठादार काेण, याचा छडा लावणे नितांत गरजेचे झाले आहे. साेलापूर पाेलिसांनी या प्रकरणात ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले असून, साेलापूर येथील मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. दरम्यान, साेलापूर पाेलिसांनी ट्रकचालक व क्लिनरची कसून चाैकशी केली. आपणाला नागपुरात कुणाकडे हे मासे न्यायचे आहेत, हे माहिती नाही. तेथे गेल्यावर ट्रकमालक सांगणार असल्याचे चालकाने सांगितले. मात्र खाण्यासाठी नाही तर औषध कारखान्यात जाणार असल्याचेही ताे म्हणताे. मात्र कुणाकडे जाणार, हे स्पष्ट नसल्याचे व याबाबत पुढची चाैकशी सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
विदर्भात उत्पादन नाही
मत्स्य व्यावसायिक प्रभाकर मांढरे यांनी सांगितले, या माशावर बंदी आणल्यापासून विदर्भात त्याचे उत्पादन थांबविण्यात आले आहे. संघटनेच्या माध्यमातून नागपूरसह भंडारा, चंद्रपूर अशा विविध जिल्ह्यांत याबाबत जनजागृती करून मांगूर माशांचे उत्पादन बंद केले आहे. मात्र शहरातील व्यावसायिकबाहेरील राज्यातून त्याची आयात करून विक्री करतात. त्यांच्यावर कारवाई हाेणे आवश्यक आहे.
या माशांच्या सेवनाने कॅन्सरचाही धाेका
उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. साेमनाथ यादव यांनी सांगितले, मांगूर माशाची भारतीय प्रजाती खाण्यासाठी अतिशय पाैष्टिक आहे. मात्र आफ्रिकन किंवा थायलंडची प्रजाती मानवी आरोग्यास अतिशय धाेकादायक आहे. या मासा काेणत्याही वातावरणात वाढताे व काेणतेही अन्न खाताे. अगदी कत्तलखान्यातील वेस्ट व मृत जनावरांचे मांसही खाताे. प्रचंड उत्पादन क्षमता असल्याने व्यावसायिक त्याचे उत्पादन घेतात. त्यामुळे देशी मांगूर प्रजातीचे प्रमाण कमी झाले आहे. हा इतर माशांच्या वाढीसाठी व पर्यावरणाच्या दृष्टीनेही हानिकारक आहे. मांसभक्षक असल्याने ताे सेवन केल्याने जनावरांमधील आजार हाेण्याची शक्यता आहे. अगदी कॅन्सरसारखे आजार हाेण्याचाही धाेका असल्याचे प्रा. यादव यांनी सांगितले. त्यामुळेच केंद्र सरकारने यावर बंदी घातली आहे.
मांगूर माशांवर बंदी आणल्यापासून विभागातर्फे माेठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. विदर्भात या माशाच्या उत्पादनावर नियंत्रण आणण्यास माेठे यश आले आहे. मात्र लपूनछपून विक्री हाेत असेल त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. याबाबत सखाेल माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
- झाडे, एसीएफ, मत्स्यपालन व व्यवसाय विभाग, नागपूर