रेवराल : महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. ४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास कारवाई करीत माैदा येथील तिडके काॅलेज राेडवरील कालव्यालगतच्या माेकळ्या जागेवर साठवून ठेवलेला ३०० ब्रास रेतीचा साठा ताब्यात घेतला. या रेतीची किंमत बाजारभावाप्रमाणे नऊ लाख रुपये असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. हा रेतीसाठा नेमका कुणाचा आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
या कालव्यालगत रेतीचा साठा असून, तिथे जेसीबीद्वारे ट्रकमध्ये रेती भरली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना मिळाली हाेती. त्यांच्या आदेशान्वये नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या नेतृत्वातील पथकाने तिथे धाड टाकली. तिथे रेतीसाठा आढळून येताच ताे ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी जेसीबी किंवा ट्रक नव्हता, अशी माहिती नवनाथ कातकडे यांनी दिली.
या रेतीची बाजारभावाप्रमाणे किंमत किमान नऊ लाख रुपये असल्याची माहिती रेती व्यावसायिकांनी दिली असून, ताब्यात घेतलेल्या रेतीची शासकीय किंमत ४ लाख ५० हजार रुपये असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रेती व्यवसायात माैदा तालुक्यातील काही राजकीय नेते व त्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यांच्या प्रभावामुळे महसूल व पाेलीस कर्मचारी त्यांच्याविरुद्ध ठाेस कारवाई करीत नाहीत. दुसरीकडे, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना दिवसभर कार्यालयीन कामे करून रात्रीच्यावेळी गस्त घालणे अथवा धाडी टाकण्याचीही कामे करावी लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. याबाबत महसूल विभागाने पाेलिसात तक्रार दाखल केली नव्हती.
---
५० ब्रास रेतीची चाेरी
या रेतीसाठ्याच्या रक्षणासाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री या साठ्यात ३०० ब्रास रेती हाेती. शनिवारी सकाळी या साठ्याची तपासणी केली असता, त्यात ५० ब्रास रेती कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रात्रभरात यातील ५० ब्रास रेती चाेरीला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
---
या रेतीसाठ्याबाबत तहसीलदारांना सूचना दिली आहे. लिलाव हाेईपर्यंत हा साठा महसूल विभागाच्या देखरेखीखाली राहणार असल्याने त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शासकीय दराने या रेतीचा लिलाव केला जाईल.
- वंदना सवरंगपते,
उपविभागीय अधिकारी, माैदा.