लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई व पुणे या दोन्ही शहरांची लोकसंख्या व विस्तार नागपूरपेक्षा मोठा आहे. असे असतानाही नागपुरात दररोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या या दोन्ही शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबई- पुण्याचा मृत्यूदर १ ते सव्वा टक्क्यापर्यंत असताना नागपुरात मात्र १.९२ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. ही आकडेवारी नागपूरची चिंता वाढविणारी आहे. नागपुरात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व बेडचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळेच मृत्यू वाढल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे. ही बाब खरी मानली तर हे पूर्णपणे जिल्हा व महापालिका प्रशासनाचे अपयश असून प्रशासनाने ही परिस्थिती सुधारण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
गेल्या २४ तासात मुंबईत ७५ व पुणे जिल्ह्यात ११५ जणांचा मृत्यू झाला. नागपुरात गुरुवारीही शंभरी ओलांडली. तब्बल ११० मृत्यूंची नोंद झाली. मागील सहा दिवसांचाच विचार करता नागपुरात २७ हजार ९३७ पॉझिटिव्ह आढळून आले, तर ३२६ लोकांचे जीव गेले. विशेष म्हणजे मुंबई व नागपुरात गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांची संख्या जवळपास सारखीच आहे. असे असताना नागपुरातच मृत्यू का वाढताहेत, हा प्रश्न चिंता वाढविणारा आहे.