नागपूर : राजकीय आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न भारतीय जनता पक्षातर्फे उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट देऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.
विरोधी पक्षांकडून विविध मुद्द्यांवर आंदोलन करण्यात येतात. मात्र काही दिवसांपासून पोलिसांकडून मनमानी पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वाडी पोलीस ठाण्यातील अंतर्गत झालेल्या आंदोलनात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीस कंट्रोल रूममध्ये बोलावून हाती पाटी देण्यात आली व त्यांची गुन्हेगारांप्रमाणे छायाचित्रे काढण्यात आली. राजकीय आंदोलने कलम ३०२ अंतर्गत येतात का, असा प्रश्न शिष्टमंडळातील नेत्यांनी उपस्थित केला. यावेळी शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, प्रदेश प्रवक्ता चंदन गोस्वामी, भाजयुमो अध्यक्ष पारेंद्र पटले, संघटनमंत्री सुनील मित्रा, शक्ती ठाकूर उपस्थित होते.