लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनोळखी आरोपींमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्याचा प्रयत्न करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. आरोपींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अतुल पंढरीनाथ जांभूळकर (वय ४७) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते धम्मदीप नगरातील रहिवासी आहेत.
जांभूळकर आणि त्यांच्याकडे भाड्याने राहणारे प्रशांत लक्ष्मण कोते हे दोघे शनिवारी रात्री ८ च्या सुमारास अंकिता किराणा स्टोअर समोरून जात होते. समोर असलेल्या दोनपैकी एका व्यक्तीचा मोबाईल खाली पडला आणि त्यावरून प्रशांत कोते यांची दुचाकी गेली. त्यामुळे मोबाईलचे नुकसान झाले. मोबाईलधारकासोबत वाद वाढू नये म्हणून कोते यांनी आरोपींना मोबाईल दुरुस्तीसाठी ५०० रुपये दिले. दरम्यान, ते दोन आरोपी आपसात भांडू लागले. ते पाहून अतुल जांभूळकर यांनी त्या दोघांना कशाला भांडता, असे म्हणून त्यांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत एकमेकांशी भांडणारे हे दोन आरोपी जांभूळकर यांच्यावर चालून आले. त्यांनी जांभूळकर यांच्या डोक्यावर, खांद्यावर चाकूचे वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे आरोपी तेथून पळाले. जखमी जांभूळकर यांना लगेच मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रशांत कोते यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.