नागपूर : राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कैद्यांना हाताळण्यासाठी तृतीयपंथी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि तृतीयपंथी कैद्यांसाठी प्रत्येक कारागृहात स्वतंत्र बराक तयार करणे यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली, तसेच यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात तृतीयपंथी उत्तमबाबा सेनापतीने याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तमबाबा तृतीयपंथी चमचम गजभियेच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी आहे. त्याला जून-२०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, पुरुष कैद्यांनी बलात्कार व मानसिक छळ केला. त्यासंदर्भातील तक्रारीची कुणीच दखल घेतली नाही, असा सेनापतीचा आरोप आहे. सध्या तो वर्धा कारागृहात आहे. उत्तमबाबातर्फे ॲड. राजेश नायक यांनी बाजू मांडली.