नागपूर - यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिले. त्यांनी आज नागपुरात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नागपूर आणि गडचिरोली परिक्षेत्रातील पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, दोन्ही परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक तसेच उपअधीक्षक उपस्थित होते. (Home Minister Walse Patil's advice to police officers)
पुढच्या दोन महिन्यांत तुमच्या विभागातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासंदर्भातील दृष्टिपथात पडेल असे कार्य पुढे आले पाहिजे, असेही बजावले. बलात्कार आणि लूटमारीचे गुन्हे वाढत आहेत. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही संख्या वाढली का? याचा विचार व्हावा, असे सांगतानाच अवैध दारू आणि व्यसनाधीनतेशी संबंधित गुन्हे वेळीच ठेचून काढा. स्थानिक लोकप्रतिनिधी, माध्यमे यांच्याकडे आपला पारदर्शी कारभार मांडा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
दारूमाफिया, वाळूमाफिया, सराईत गुन्हेगारांच्या हालचालीची नोंद ठेवा. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि ठाणेदाराने ठरवले तर प्रत्येक ठाण्याच्या परिसरात गुन्हे घडू शकत नाही. त्यामुळे गुन्हे का घडत आहे याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही त्यांनी दिला. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांत मादक पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, ही बाब धोकादायक आहे. त्यामुळे नव्या पिढीला विश्वासात घेऊन काम करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जाणून घेतल्या समस्या
गृहमंत्र्यांनी प्रारंभी प्रत्येक गुन्ह्याची नोंद, दोषसिद्धता, प्रतिबंधात्मक कारवाई, मोक्का आदी गुन्ह्यांच्या संदर्भातील कारवाई, मादक पदार्थ तस्करी, अवैध धंदे, पोलिसांची घरे, वाहनांची उपलब्धता, पदांची कमतरता, पोलिसांमार्फत सुरू असलेल्या सामाजिक कार्याबाबतचा आढावा घेतला. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
वर्धेची दारूबंदी अन् चंद्रपूरचे अवैध धंदे
बैठकीत वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी आणि चंद्रपूरमधील अवैध धंदेही चर्चेला आले. गडचिरोली परिक्षेत्रातील पोलिसांच्या सुविधेसंदर्भात सातत्याने मुंबईला पाठपुरावा करण्याबाबतचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले. गडचिरोली जिल्ह्यातील युवक नक्षल चळवळीकडे वळता कामा नये. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासन तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
- विकास आणि रोजगाराची वानवा असल्यामुळे गडचिरोली-गोंदियात नक्षलवाद फोफावला. त्यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले असून, आता तेथील जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत आहे.
- नागपुरात बदली झाली की अधिकारी येथे रुजूच होत नाही. हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही.
- परमबीर सिंग कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला असता ‘तुम्हाला माहीत असेल तर मला कळवा’, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले.