ऑनलाईनच्या युगात भूमापन विभागाच्या चकरा कशासाठी?
नागपूर : घर असो वा शेत मोजणीसाठी भूमापन विभाग कार्यालयाच्या माराव्या लागणाऱ्या चकरा आणि त्यासाठी होणारा आर्थिक त्रास बघितला तर असे वाटते, आपण कोणत्या युगात राहतो. शिवाय, हा आपलाच देश आहे ना, असा एक प्रश्न पडतो, अशी भावना श्रीगुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यक्त केली.
ज्ञानेश्वर रक्षक यांचे वडील दुर्गादास रक्षक यांनी आपल्या मृत्यूपत्रात नागपूर नागपूर महानगरपालिकेचा घर टॅक्स ज्ञानेश्वर यांच्या नावे करावा, असा विनंती अर्ज मनपाकडे केला. मात्र, बाबूने सिटी सर्वेत नाव चढवण्यास सांगितले. याबाबत मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्याशी भेटले असता त्यांनी बाबूला कायदा समजावून सांगत टॅक्स ज्ञानेश्वर यांच्या नावे करण्यास सांगितले. त्याअनुषंगाने दुर्गादास रक्षक यांचे नाव कमी करण्यासाठी मार्च महिन्यात सिटी सर्वे अर्थात भूमापन विभागात अर्ज केला. मात्र, आता या कामाला किती वर्ष लागतील, हे मनपाच सांगेल. विशेष म्हणजे, ऑनलाईनच्या या काळात वारसदाराचे नाव चढविण्यासाठी मनपा, नगर परिषद, तहसीलदार, पटवारी यांच्याकडे देण्यात येणारे लेखी निवेदनच ग्राह्य धरून त्या सर्व विभागाकडील रेकॉर्ड भूमापन कार्यालयाकडे जाऊन ऑनलाईन नोंदणी होणे अपेक्षित आहे. यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा पुढाकार घेऊन भ्रष्टाचाराला लगाम लावणे गरजेचे असल्याचे मत ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यक्त केले.
....................