नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक तक्रारीची भीती दाखवून सात विभागप्रमुखांकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणाची सध्या विभागीय चाैकशी सुरू आहे. या प्रकरणात विद्यापीठाचे शैक्षणिक किंवा विद्यार्थी स्तरावरचे नुकसान न झाल्याने विद्यापीठाद्वारे एफआयआर दाखल करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, धर्मेश धवनकरांविरुद्ध पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या विभागप्रमुखांनी पाेलिस स्टेशनमध्ये एफआयआर का दाखल केला नाही, हे अनाकलनीय असल्याची भावना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांनी व्यक्त केली.
सात विभागप्रमुखांनी माध्यमांकडे तक्रार केली व माध्यमांकडून प्रकरण समाेर आल्यानंतर हालचाली केल्याचे कुलगुरुंनी सांगितले. दाेन्ही पक्षांचे म्हणणे ऐकले. विभागप्रमुखांनी आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगितले हाेते. मात्र, धर्मेश धवनकरांनी वैयक्तिक संबंधामुळे घराची किस्त भरण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे सांगितले हाेते. त्यानंतर या प्रकरणात निवृत्त न्यायधीशांच्या माध्यमातून चाैकशी करण्यात आली. या चाैकशीत काहीतरी काळेबेरे आढळल्यानेच प्रकरणाच्या विभागीय चाैकशीचे आदेश देण्यात आले. सध्या चाैकशी सुरू असून, लवकरच या प्रकरणात निर्णय येईल, अशी आशा कुलगुरुंनी व्यक्त केली. दरम्यान, धर्मेश धवनकरांची सक्तीची रजा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमकेसीएलच्या प्रकरणात फारसे काही निघणार नाही
विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांचे नियाेजन एमकेसीएल कंपनीकडे देण्यावरून उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने कुलगुरू डाॅ. चाैधरी यांच्यावर ताेशेरे ओढले हाेते. मात्र, बाविस्कर समितीच्या अहवालाला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे कुलगुरू म्हणाले. एमकेसीएल कंपनी काळ्यात यादीत टाकली गेली असती तर इतर विद्यापीठांनीही कंपनीची सेवा का स्वीकारली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या चार-पाच बैठकांनतरच एमकेसीएलकडे काम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुलगुरू यांनी सांगितले. त्यामुळे कुलगुरुंना दाेष देण्यात अर्थ नाही. या प्रकरणात प्रधान सचिवांच्या पत्राला रीतसर उत्तर पाठविल्याचे डाॅ. चाैधरी यांनी सांगितले.
संविधान पार्क बुद्ध पाैर्णिमेपर्यंत व्हावे
संविधान प्रस्ताविका पार्कचा मुद्दा आता संपलेला आहे. पार्क समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या सूचनेवरून जुन्या सदस्यांना कायम ठेवले असून, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील निर्णयानुसार नव्या सदस्यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. डाॅ. बाबासाहेबांचा पुतळा पूर्ण झालेला आहे. आता केवळ म्यूरल्सचे काम तेवढे बाकी आहे, जे नासुप्रद्वारे करण्यात येत आहे. डाॅ. आंबेडकर जयंतीला उद्घाटन व्हावे, असे वाटत हाेते. मात्र, ते बुद्ध पाैर्णिमेपर्यंत तरी हाेईल, अशी आशा कुलगुरुंनी व्यक्त केली.