चंद्रभागा नदीवरील पुलाचे काम का रखडले? हायकोर्टाची विचारणा
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 8, 2023 05:22 PM2023-03-08T17:22:20+5:302023-03-08T17:23:15+5:30
उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील गोवरी येथील चंद्रभागा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम का रखडले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी केली. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात ॲड. अरविंद वाघमारे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या पुलासाठी नाबार्डने २०१८-१९ मध्ये तीन कोटी रुपये मंजूर केले. परंतु, भूमीपूजन जानेवारी-२०२२ मध्ये करण्यात आले आणि प्रत्यक्ष कामाला मे-२०२२ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जुलै-२०२२ मध्ये काम बंद पडले. गोवरी येथे आधी केवळ अडीच फुट उंचीचा पुल होता. पावसाळ्यात हा पुल नेहमीच पाण्याखाली राहत होता. या पुलामुळे सहा व्यक्तीचा मृत्यूही झाला.
नवीन पुलासाठी जुना पुल पाडण्यात आला आहे. दरम्यान, नवीन पुलाचे बांधकाम थंडबस्त्यात गेले. परिणामी, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कळमेश्वर, खैरी, पारडी, गोवरी, तोंडाखैरी, सिल्लौरी, बेलोरी, सेलू, परसोडी, बोरगाव, झुनकी, वाकीचे इत्यादी गावांतील नागरिकांच्या सुविधेसाठी नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.