दयानंद पाईकराव, नागपूर : ‘तु मला मागच्या संक्रांतीला झापड का मारली ?’ असे म्हणून दोन आरोपींनी एका युवकावर चाकुने वार करून त्याला जखमी केले. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याचा साथीदार फरार आहे.
सुजल राजेश महेशकर (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार रुद्र साखरे (वय १९) असे फरार झालेल्या साथीदाराचे नाव आहे. दोघेही रा. न्यु इंदोरा, रिपब्लिकननगर, जरीपटका येथे राहतात. तर आशिष अरुण खोब्रागडे (वय ३३, रा. रिपब्लिकनगर न्यु इंदोरा) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री आशिष आपल्या शेजारी राहणारे नातेवाईक रतन रामटेके (वय ४८) यांच्यासोबत घरासमोर उभा होता. तेवढ्यात आरोपी सुजल आणि रुद्र तेथे आले.
सुजलने आशिषला तु मला मागच्या संक्रातीला झापड का मारली ? असे म्हटले. त्यावर आशिषने त्याला मी घराबाहेर निघालोच नव्हतो, मी तुला मारले नाही असे सांगितले. त्यावर आरोपी रुद्र याने ‘भाई इसकी हिम्मत कैसे हुई तुझे झापड मारनेकी, इसको आज खतम कर देते’ अशी चिथावनी दिली. त्यावर आरोपी सुजलने आशिषला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ््यावर चाकुने वार केला, परंतु आशिष स्वत:ला वाचविण्यासाठी मागे झाल्याने चाकु त्याच्या हाताला लागला. यात तो जखमी झाला. आशिष घरात गेला आणि त्याने दार बंद केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. जखमी आशिषवर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले.
आशिषने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०७, ११४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी सुजलला अटक केली आहे. पुढील तपास जरीपटका पोलिस करीत आहेत.