नागपूर : शिक्षकांकडे अगोदरच अध्यापनाचे काम आहे. यासोबतच शासनाकडून आलेल्या विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.राज्य शासनाकडून शिक्षकांना अतिरिक्त कामांना जुंपले जात असल्याचा आरोप करत शिक्षक भारती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी जोरदार धरणे आंदोलन केले.जनगणना, नैसगिक आपत्ती व्यवस्थापन, विधिमंडळ व संसदेच्या निवडणुका आणि प्रत्यक्ष निवडणुकांची कामे वगळता शिक्षकांना इतर कामे देऊ नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. मात्र राज्य शासनाकडून शिक्षकांना खंडविकास अधिकाऱ्याची (बीएलओ) कामे लावण्यात आल्याने शिक्षकांमध्ये रोष आहे. त्याविरोधात शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र झाडे, कार्यवाह प्रा. दिलीप तडस आणि शहराध्यक्ष सपन नेहरोत्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.गत काही वषार्पासून खंडविकास अधिकाऱ्यांचे कामही शिक्षकांच्या माथी मारण्यात येते. तसे न केल्यास शासनाकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे शालेयस्तरावर लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, वार्षिक गुण संकलन करणे, निकालाची तयारी करणे आदी कामे कशी करावी हा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. धरणे आंदोलनात शिक्षणमंत्री आणि शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात भरत रेहपाडे, दीपक नागपुरे, देवीदास नंदेश्वर, लक्ष्मीकांत बावनकर, किशोर वरभे, अनघा वैद्य, विलास गभणे, केशव राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
'बीएलओ'च्या कामासाठी शिक्षकांना का जुंपले?
By admin | Published: April 19, 2015 2:25 AM