नागपूर : पाणी हे जीवन आहे, म्हणूनच असेल कदाचित आपल्या पूर्वजांनी पाण्याला थेट धर्माची उपमा दिली. साध्या पाण्यानेही मोठे धर्मकारण साधले जाऊ शकते, हाच संदेश यातून द्यायचा होता. तो संदेश समाजापर्यंत नीट पोहोचला अन् एखाद्याची तृष्णा भागवण्याला पुण्याचे काम समजले जाऊ लागले.म्हणूनच कधी काळी उन्हाळा आला की आपल्या नागपुरातील सहृदयी माणसे चौकचौकात पाणपोई उभारायचे. परंतु पुढे काळ बदलला आणि पाणी हे पुण्याचे नसून व्यवसायचे माध्यम झाले. आता शहरात अपवादानेच पाणपोया दिसतात. परिणामी साधे पाणीही विकत घेऊन प्यावे लागते. अन् ज्यांच्यात ते विकत घेण्याची क्षमता नसते ते बिचारे कोरड्या गळ्यानेच रखरखत्या उन्हात धावत असतात पोटासाठी. तहानलेल्यांना पाणी पाजून त्याची तृष्णा भागवण्यात फार मोठे पुण्य लाभते. यामुळे अनेक समाजसेवी संस्था, संघटनांतर्फे शहरातील चौकाचौकात प्याऊ लावण्यात येतात. रस्त्याने जाणाऱ्याला तहान लागली की तो या प्याऊमधील पाणी पिऊन पुढे जातो. मागील वर्षापर्यंत शहरात प्याऊंची संख्या बऱ्यापैकी होती. परंतु यंदाच्या उन्हाळ्यात मात्र शहरातील अनेक प्याऊ बंद पडलेल्या अवस्थेत आढळून आले. अनेक प्याऊ केवळ मागील वर्षी सुरू करून बंद करण्यात आल्यामुळे तेथे कचरा, घाण साचली आहे. त्यामुळे उपराजधानीच्या दातृत्वाची भावना लोप होत चाललीय की काय, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.पाणी पाऊचची विक्री वाढलीशहरात अचानक प्याऊंची संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे चौकाचौकात पानठेला चालक, चहा विक्रेते थर्माकोलच्या डब्यात पाणी पाऊच विक्रीसाठी ठेवत असल्याचे चित्र दिसले. तीन रुपये देऊन एक पाऊच विकण्यात येते. त्यामुळे एखाद्या गरिबाला तहान लागल्यास आणि त्याच्या खिशात पैसे नसल्यास त्याचा नाईलाज होत आहे.
‘पाण्याचा धर्म’ विसरलो का आपण?
By admin | Published: May 09, 2015 2:15 AM