नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वाडी येथील वेलट्रिट हॉस्पिटलमधील भीषण अग्निकांडाला आता पावणेदोन महिने झाले. या अग्निकांडात चाैघांचे बळी गेल्यानंतर त्यावेळी दु:खाने होरपळलेल्या कुटुंबीयांच्या भावनांवर नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आश्वासनांची कोरडी फुंकर घातली. मात्र, आता पावणेदोन महिने होऊनही त्यांना कसलीही आर्थिक मदत मिळाली नाही. पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र, अटकेसारखी ठोस कारवाईही झाली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना चिघळल्या आहेत. आम्हा गरिबाचा कुणी वाली नाही का, आमच्या जीवाला मोल नाही का, असे प्रश्न मृतांचे शोकसंतप्त नातेवाईक उपस्थित करीत आहेत.
वाडीतील वेलट्रिट हॉस्पिटलला ९ एप्रिलला रात्री हॉस्पिटलला भीषण आग लागली. आगीत तुळशीराम सापकन पारधी, शिवशक्ती भगवान सोनबरसे, प्रकाश बापूरावजी बोळे आणि रंजना मधुकर कडू या चाैघांचा होरपळून मृत्यू झाला. काहीजण श्वास गुदमरून, तर काही भाजून जखमी झाले. उपचारादरम्यान ते बचावले. मात्र, त्यांच्याही मनावरही या घटनेच्या खोल जखमा झाल्या आहेत. या अग्निकांडानंतर त्यावेळी अनेक नेत्यांनी मृतांच्या नातेवाइकांबाबत कोरडी सहानुभूती व्यक्त केली. त्यांना शासकीय नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, असेही नेते मंडळींनी तसेच अधिकाऱ्यांनी खासगीत पत्रकारांना सांगितले. त्यासाठी तातडीचे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यावेळी सुतोवाच केले. मात्र, आता पावणेदोन महिने झाले. मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून साधी दमडीही सानुग्रह मदत म्हणून मिळाली नाही. भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणात पहिल्याच दिवशी सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा झाली अन् वाटपही झाले. वेलट्रिटच्या अग्निकांडातील मृतांचे नातेवाईक वाऱ्यावर सोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र आहेत. या संबंधाने एका मृताचे नातेवाईक प्रवीण महंत आणि पारधी यांचा मुलगा शुभम यांनी आमच्या नातेवाइकांच्या जीवाला काहीच मोल नाही का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, अग्निकांडाची चाैकशी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस त्यावेळी आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे सक्रिय झाले होते. वीज विभाग आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनीही आगीचे कारण जाणून घेत तसा अहवाल सरकारी यंत्रणेला दिला. त्यानंतर पोलिसांनी वेलट्रिट हॉस्पिटलचे डॉ. राहुल ठवरे आणि हॉस्पिटल प्रशासनाला जबाबदार धरून डॉ. ठवरे तसेच प्रशासनातील मंडळींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ भा.दं.वि. ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप कसलीही ठोस कारवाई संबंधित आरोपींवर झालेली नाही. त्यामुळे मृतांच्या भावना जास्तच तीव्र झाल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून नो रिस्पॉन्स
वारंवार चकरा मारूनही जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला कवडीची मदत मिळाली नाही, असे प्रवीण महंत म्हणतात. या संबंधाने माहिती घेण्यासाठी
लोकमतने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल ‘नो रिस्पॉन्स’ होता.
चाैकशी सुरू, दोषींवर कारवाई होणारच - अमितेशकुमार
सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन ४५ दिवस झाले तरी अटकेची कारवाई का झाली नाही, अशी विचारणा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली असता काही तांत्रिक मुद्द्यांची चाैकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे ते म्हणाले.
---