नागपूर : पेट्रोलियम कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आधीच महागाईला तोंड देत असलेल्या सर्वसामान्य माणसाला आणखी फटका बसणार आहे. नागपुरात १४.२ किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर आता ९३४.५० रुपये झाला आहे. याआधी सिलिंडर ९११.५० रुपयांना मिळत होते. जानेवारी २०१८ मध्ये सिलिंडरचे दर ९९३ रुपये होते. फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेला सर्वसामान्य माणसाला घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे मोठाच फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळेदेखील नागरिक आधीच हैराण झालेले आहेत. इंधनदरवाढीमुळे नागरिकांना इतर महागाईला तोंड द्यावे लागत आहे, कारण दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने त्यांच्याही किमतीत वाढ होत आहेत.
महिना दर (रुपयांत)
डिसेंबर ६४६
जानेवारी ७४६
फेब्रुवारी ७४६
मार्च ८७१
एप्रिल ८६१
मे ८६१
जून ८६१
जुलै ८८६
ऑगस्ट ९११
सप्टेंबर ९३६
सबसिडी किती भेटते हो भाऊ
मे २०२० पासून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवर प्राईस रेटनुसार सबसिडी देणे बंद केले आहे. जवळपास १६ महिन्यांपासून ग्राहकांच्या बँक खात्यात केवळ ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. त्या तुलनेत सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यात वाढत आहेत. पुढे सबसिडी बंद करीत असल्याचे यावरून दिसून येते. सबसिडी पुन्हा सुरू करण्याची ग्राहक संघटनांची मागणी आहे. सबसिडीअभावी केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेला फटका बसणार आहे. सरकार कमी उत्पन्न गटातील महिलांना गॅस शेगडी व सिलिंडर मोफत देतील; पण पुन्हा ९११ रुपयांचे नवीन सिलिंडर खरेदी करणे त्यांना परवडणारे नाही. ही योजना पुढे थंड बस्त्यात जाणार आहे.
व्यावसायिक सिलिंडर महाग, भाव १८३४ रुपये
वर्षभरात व्यावसायिक सिलिंडरचे दर ५७७ रुपयांनी वाढले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात १९ किलो सिलिंडरचे दर १२५७ रुपये होते. यावर्षी १ सप्टेंबरला १८३४ रुपये दर आहेत. सरकारने १५ दिवसात दरवाढ करून ऑगस्टच्या १७५९ रुपयांच्या तुलनेत दर १८३४ रुपयांवर पोहोचले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ७० रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि टपरीचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढविले आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. अशीच दरवाढ सुरू राहिल्यास सणासुदीत तयार खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. दरवाढ होऊ नये म्हणून सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी हॉटेल व रेस्टॉरंट मालकांची मागणी आहे.
महिन्याचे गणित कोलमडले :
सिलिंडरच्या किमती दर महिन्यात वाढत असल्याने महिन्याचे बजेट वाढत आहे. दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांना त्रास होत आहे. उत्पन्न कमी, खर्च जास्त, अशी स्थिती आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्चही वाढला आहे. सरकारने वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे.
प्रिया सलामे, गृहिणी.
सर्वच वस्तूंची दरदिवशी होणारी दरवाढ जीवघेणी ठरत आहे. हातात पैसा उरत नाही. दर महिन्याला उधारी घ्यावी लागत आहे. सरकारने गरीब आणि सर्वसामान्यांचा विचार करून जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत. कोरोनानंतर सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. कृत्रिम दरवाढ नकोच.
शालिनी देवघरे, गृहिणी.
दर महिन्याला नवा उच्चांक (ग्राफिक्स)