- राष्ट्रवादीने उपाध्यक्ष आणि दोन सभापती पदे देण्याची मागणी काॅंग्रेसकडे केली होती. यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग आग्रही होते. मात्र, काँग्रेसने ही मागणी फेटाळून लावली होती.
- जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे या राष्ट्रवादीच्या कोट्यातून नव्हे तर स्वत:च्या राजकीय वजनातून सभापती झाल्या, असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात.
- काँग्रेसने पदवाटपात आघाडीचा धर्म पाळला नसल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या १८ आणि पंचायत समितीच्या १५ जागा स्वबळावर लढवून राष्ट्रवादीला काँग्रेसची कोंडी करायची आहे. हा निर्णय घेताना राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात पक्षाला संवाद यात्रेदरम्यान मिळालेल्या नागरिकांच्या प्रतिसादाचा संदर्भ देत आहेत.
-
जिल्हा परिषदेत काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यामुळे नाराज झाले. त्यामुळे आता रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर मैदानात उतरणार आहे. अठरा मंडलांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. या निवडणुकीनंतर आघाडीबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसी प्रवर्गातील १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहिला आहे. २०१६मध्ये या मुद्द्यावर भाजपच्या काही मंडळींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता होती. त्यावेळी अडीच वर्षे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेस या निर्णयात सरकारसोबत आहे. अशात काही सदस्यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. याबाबत अद्याप सुनावणी झालेली नाही. ओबीसींना त्यांचे अधिकार मिळवून देणे ही काँग्रेसची भूमिका आहे.
- राजेंद्र मुळक, अध्यक्ष, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)
भाजपनेही कंबर कसली
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप नेते मैदानात उतरले आहेत. जिल्हा परिषदेत ओबोसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्यास सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यातच निवडणुका झाल्यास ओबीसींचा मुद्दा पुढे करत भाजप जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. यासाठी भाजपने मंडलनिहाय कृती आरखडा निश्चित करत उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यासंदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी नागपुरात झाली.