आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरात कचरा का होतो, याची कारणे जगजाहीर आहेत. याची कारणेही सर्वांनाच ठाऊ क आहेत. स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागात अनुभवी अधिकारी व कर्मचारी आहेत. झोन स्तरावर यंत्रणा आहे. असे असतानाही कचऱ्यासाठी सल्लागार (कन्सलटंट) नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर ८.८० लाखांचा खर्च केला जाणार आहे.सल्लागार म्हणून मुंबईच्या नागरी आणि पर्यावरण अभ्यास प्रादेशिक केंद्र (आरसीयूईएस) या संस्थेची निवड करण्यात आली आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी ही संस्था महापालिकेला शहरात कचरा का होतो, यावर उपाययोजना करण्यासंदर्भात सल्ला देणार आहे. सोबतच प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे. यासाठी या संस्थेचे दोन ते तीन प्रतिनिधी चार महिन्यात आठवेळा भेटी देऊन मार्गदर्शन करणार आहे. यासाठी हा खर्च केला जाणार आहे. आरोग्य विभागाच्या याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.शहर स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. शहरातील कचरा उचलण्याची व वाहून नेण्याची जबाबदारी कनक रिसोर्सेस या कंपनीकडे सोपविली आहे. तर रस्ते व सार्वजनिक परिसर ऐवजदारांच्या माध्यमातून स्वच्छ केला जातो. आरोग्य विभागात अनुभवी व तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी आहेत. २० ते २५ वर्षांपासून ते स्वच्छतेची जबाबदारी सांभाळतात. कचरा का होतो, याची त्यांना जाणीव आहे. यावर कोणत्या उपाययोजना करावयाच्या आहेत, याचाही त्यांना अभ्यास आहे. एवढेच नव्हे तर स्वच्छ शहराच्या यादीत नागपूर शहराचा अव्वल क्रमांक येण्यासाठी कोणत्या आवश्यक उपाययोजना करावयाच्या आहेत, याचीही त्यांना कल्पना आहे. असे असतानाही शहरात कचरा का होतो, याचा शोध घेण्यासाठी सल्लागार नियुक्त का करावा, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
पर्यायी व्यवस्था म्हणून सल्लागारनागपूर शहराचा स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी प्रयत्न आहेत. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यासाठी मनुष्यबळ नाही. आरसीयूईएस संस्थेला याचा अनुभव आहे. पुणे, नांदेड महापालिकत या संस्थेने काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ व्हावा या हेतूने सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. याला मंजुरी मिळाली आहे.- जयंत दांडेगावकर, अतिरिक्त उपायुक्त, महापालिका