लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर – राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी पदवीधर निवडणुकांच्या उद्देशांवरच सवाल उपस्थित केले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका या इतर निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतात. यात तसे पाहिले तर राजकीय पक्षांची काहीच भूमिका अपेक्षित नसते. मात्र केवळ स्वतःचा अजेंडा राबविण्यासाठी पक्ष स्वतःचे उमेदवार उभे करतात. या निवडणुका पक्षविरहित का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विदर्भवादी संघटनांचे समर्थन लाभलेले अपक्ष उमेदवार नितीन रोंघे यांच्या पत्रपरिषदेदरम्यान अणे यांनी शुक्रवारी ऑनलाईन माध्यमातून आपली भूमिका मांडली. राजकीय पक्ष सोयीसाठी स्वतःचे उमेदवार उभे करतात. असे असेल तर मग या मतदारसंघाची वेगळी निवडणूक घेण्याची आवश्यकताच नाही. या मतदारसंघात उमेदवारांकडून कुठल्याही पक्षाची चाकरी व्हायला नको. या मतदारसंघाच्या आमदाराकडून पक्षविरहित कामाची अपेक्षा आहे, असे अणे म्हणाले.
प्रस्थापित पक्ष विदर्भाला विसरले
निवडणुका आल्या की कॉंग्रेस-भाजपा व इतर प्रस्थापित पक्षांना विदर्भाचा मुद्दा आठवतो. मात्र विदर्भ राज्याची निर्मिती व विदर्भाचे प्रश्न या पक्षांच्या माध्यमातून सोडविल्या जाईल ही एक परिकथाच आहे. हे पक्ष विदर्भाला विसरले आहेत, अशी टीका श्रीहरी अणे यांनी केली.