नागपूर :भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसीच्या संदर्भात शरद पवार यांच्यावर आरोप केले. परंतु भाजपाच्या काळात ओबीसींवर मोठया प्रमाणात अन्याय होत आहे, याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही. ओबीसी समाजाबदल आपुलकी असती तर ओबीसींच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम बावनकुळे यांनी व त्यांचे सरकारने केले असते. ओबीसी संदर्भातील बावनकुळे यांचे प्रेम पुतणा मावशीचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी केला आहे.
ओबीसीची जातीनिहान जनगणना व्हावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासुन होत आहे. देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. आरक्षणाच्या दुष्टीकोणातुन ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाल्यास त्याचा फायदा हा समाजाला होईल. या गंभीर बाबीकडे चंद्रशेखर बावनकुळे व त्यांचे सरकार हे लक्ष का देत नाही ? राज्य सरकारने प्रत्येक जिल्हात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृह सुरु करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात केली होती. १५ ऑगष्ट पुर्वी राज्यात एकुण ७२ वसतिगृह सुरु करण्याची घोषणा करुन आज वर्ष उलटत चालले आहे. परंतु अद्याप एकही वसतिगृह सुरु का करण्यात आले नाही? याकडे बावनकुळे यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य सरकारने ओबीसींना घरकुल देण्याची योजना आणली खरी, परंतु त्याचा फायदा हा ओबीसी समाजाला होणार नाही. घरकुल बांधण्यासाठी जो निधी देण्यात येणार तो केवळ १ लाख २० हजार इतका आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सुध्दा इतकाच निधी देण्यात येतो. परंतु ग्रामिण गृहनिर्माण विभागाच्या एका अहवालानुसार घरकुल बांधण्यासाठी पैसेच नसल्याने राज्यातील जवळपास २ लाख ३६ हजार ३५० घरकुलाचे अपुर्ण बांधकामे आहेत. यामुळे ओबीसी समाजाला देण्यात येणाऱ्या घरकुल बांधकामाच्या निधीत वाढ होण्यासाठी बावनकुळे व त्यांचे सरकार लक्ष देतील काय, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थीत केला.
स्वाधार योजनेच्या माध्यमातुन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात निवास व भोजनाच्या खर्चाची रक्कम जमा करण्यात येते. याच धर्तीवर ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांला सुध्दा मदत करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु अद्यापही याची पुर्तता करण्यात आली नाही. या शिवाय ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे देशात आणि राज्यात सरकार आहे. त्यांनी आपल्या या पदाचा उपयोग करुन ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याचा फायदा हा समाजाला होईल असे सुध्दा अनिल देशमुख यांनी मत व्यक्त केले.