सुनील चरपे
नागपूर : चालू आठवड्यात कापसाचे दर प्रति क्विंटल ४५० ते ५०० रुपयांनी तर सरकीचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी उरतले आहेत. चालू हंगामात देशभरातील कापसाचे उत्पादन घटत असल्याचा अंदाज तीन महत्त्वाच्या संस्थांनी व्यक्त केला आहे. कापसाची दरवाढ अपेक्षित असताना कमी उत्पादनाचे भांडवल करून कापड उद्याेग कापसाची आयात वाढविण्यासाठी तसेच कापसावरील ११ टक्के आयात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या प्रतिक्रिया बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.
‘काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया’ने ३७५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला हाेता. हा अंदाज ३२१.५० लाख गाठींवरून घटवून ३०३ लाख गाठींवर आणला आहे. ‘युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अमेरिका’ने त्यांचा कापूस उत्पादन अंदाज ३६२ लाख गाठींवरून नंतर ३३९ लाख गाठी आणि आता ३१३ लाख गाठींवर तर ‘कमिटी ऑफ काॅटन प्राॅडक्शन ॲण्ड कन्झमशन’ने त्यांचा अंदाज ३६५ लाख गाठींवरून ३३७ लाख गाठींवर आणला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात दाेन महिन्यांपासून रुईचे दर ९६ ते ९९ सेंट प्रति पाउंड दरम्यान स्थिर आहेत. भारतात मध्यंतरी सरकीचे दर प्रति क्विंटल ३,३०० रुपयांवर गेल्याने कापसाच्या दराने आठ हजार रुपयांवर मजल मारली हाेती. हे दर २०० ते ३०० रुपयांनी कमी झाल्याने कापसाचे दर परत आठ हजार रुपये प्रति क्विंटलवरून ७,६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. येत्या महिनाभरात सरकीच्या दरात तेजी येण्याची शक्यता कमी असल्याची माहिती विजय निवल यांच्यासह अन्य जिनिंग-प्रेसिंग मालकांनी दिली. सूत आणि कापडाची मागणी घटल्याने कापसाचे दर दबावात आल्याची माहिती कापड उद्याेजकांनी दिली.
३६.३९ लाख गाठींनी आवक घटली
या हंगामात देशांतर्गत बाजारातील कापसाची आवक ३६.३९ लाख गाठींनी घटली आहे. १ ऑक्टाेबर २०२१ ते १९ एप्रिल २०२२ या काळात देशभरात २५१.५९ लाख गाठी कापूस बाजारात आला हाेता. या हंगामात १ ऑक्टाेबर २०२२ ते १९ एप्रिल २०२३ या काळात २१५.२० लाख गाठी कापूस बाजारात आला.निर्यातीऐवजी आयातीवर भर
सन २०२१-२२ च्या हंगामात भारताने ४८ लाख गाठी कापसाची निर्यात केली हाेती. सन २०२२-२३ च्या हंगामात आजवर किमान २० लाख गाठी कापूस निर्यातीचे साैदे झाले नाहीत. किमान ५० लाख गाठी कापूस निर्यात झाला असता दर आणखी वधारले असते. मात्र, कापसाचे उत्पादन घटत असल्याचे दाखवून आधीच १५ लाख गाठी कापसाची आयात करून दर दबावात आणले आहे. आता कापड उद्याेजक कापसावरील ११ टक्के आयात शुल्क हटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सध्या अडचणीचा काळ असल्याचे दरवाढीची चिन्हे दिसत नाही. या महिन्यात कापसाची आवक वाढली तर दर कमी हाेतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी न घाबरता मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कापूस विक्रीचे नियाेजन करावे.
- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य.
बाजारात कापसाची आवक वाढली तर दर कमी हाेणार आहेत. दर खाली येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी.
- दिलीप ठाकरे, सदस्य, एमसीएक्स-पीएसी (काॅटन).
कापसाची आयात करता यावी, यासाठी कापूस उत्पादन घटल्याची आकडेमाेड केली जात आहे. यातून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून आयात शुल्क शून्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे. खरं तर सरकारने कापसाची निर्यात वाढवायला हवी.
- विजय जावंधिया, शेतकरी नेते.