कॅगच्या अहवालात ताशेरे असतानाही गडकरींना ईडी, सीबीआयची नोटीस का नाही? काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचा सवाल
By कमलेश वानखेडे | Published: April 15, 2024 06:03 PM2024-04-15T18:03:56+5:302024-04-15T18:04:29+5:30
नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
कमलेश वानखेडे, नागपूर : भारतमाला परियोजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. कंत्राटदारांनी कंत्राट मिळविण्यासाठी कागदपत्रांचा आधार घेतला. कॅबीनेट कमिटीच्या मंजुरीशिवाय १ लाख कोटींचे बॉण्ड काढण्यात आले. कॅगने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या मंत्रालयावर आरोप केले आहेत. मग त्यांना ईडी किंवा सीबीआयने नोटीस का पाठविलेली नाही, त्यांना गडकरींचा पत्ता माहीत नाही का, असा सवाल अ. भा. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते पवन खेडा यांनी केला.
नागपूर येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना खेडा म्हणाले, एनएचआयने घेतलेल्या कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत फक्त व्याजापोटी ३८ हजार कोटी दिले जात आहेत. एनएचआयने बांधलेल्या रस्त्यांच्या किमती सीसीएने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा दुप्पट खर्चात गेल्या आहेत. ‘चंदा दो, धंदा लो’ असे एनएचआयच्या कामातही सुरू असल्याचा आरोप खेडा यांनी केला. यावेळी प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे व सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.
संविधानाला धक्का लावण्याच्या हालचाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील संविधान बदलू शकत नाही, असे सांगितले. पण दुसरीकडे त्यांचे अयोध्येचे खासदार ४०० जागा द्या संविधान बदलू, असे सांगतात. अनंत हेडगे, अरुण गोविल हीच भाषा बोलतात. त्यावर पंतप्रधान मोदी बोलत नाही. यावरून संविधान बदलण्याचा कट रचला जात असल्याचा संशय येतो. भाजप ज्या पद्धतीने ४०० पार जागा मागत आहे. एकदा हुकूमशहाच्या हाती एकतर्फी सत्ता आली तर मग तो काहीच विचार करीत नाही, अशी टीकाही खेडा यांनी केली.
-गॅरंटी शब्द काँग्रेसपासून चोरला
भाजपने गॅरंटी हा शब्द काँग्रेसपासून चोरला आहे. तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये काँग्रेसने मतदारांना दिलेली गॅरंटी पूर्ण करून दाखवली. आताही काँग्रेसने लाखो लोकांची मते जाणून घेत जाहीरनामा तयार केला आहे, असेही खेडा यांनी सांगितले.