हरियाणातील भ्रष्टाचाराची चौकशी ईडी-सीबीआयमार्फत का नाही? आमदार नीरज शर्मांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 11:30 AM2022-04-04T11:30:16+5:302022-04-04T11:35:04+5:30
आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे.
नागपूर : छोट्या-छोट्या प्रकरणांची ईडी-सीबीआयमार्फत चौकशी केली जाते परंतु हरियाणा येथील शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार उघडकीस येऊनही त्याची चौकशी ईडी-सीबीआयमार्फत का केली जात नाही? असा सवाल भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत अंगावर शिवलेले कपडे परिधान करणार नाही तसेच पायात चप्पल व जुते घालणार नाही, असा पण करणारे काँग्रेसचेआमदार नीरज शर्मा यांनी येथे उपस्थित केला. रविवारी काही कामानिमित्त ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.
आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. त्यावर त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले. त्यांची चौकशी झाली. दक्षता समितीने गुन्हे दाखल करण्याची शिफारसही केली तरी कारवाई झाली नाही.
चार-पाच वर्षांपासून आपण भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. त्याचे पुरावेसुद्धा सादर केले. या घोटाळ्यात सामील अधिकाऱ्यांची नावेसुद्धा सभागृहात जाहीर केली. तरी कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट विधानसभा सभागृहातच उपरोक्त संकल्प केला. याला आता १५ दिवस होत आले आहेत. त्यांचे हे चालते फिरते आंदोलन अजूनही सुरूच आहे. यावेळीसुद्धा त्यांनी आपला पण पुन्हा एकदा बोलून दाखविला. त्यांचे म्हणणे होते की, मी भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे सादर केले तरी कारवाई होत नाही, याला काय म्हणावे?
अंगावर शिवलेले कपडे घालणार नाही
अंगावर शिवलेले कपडे घालणार नाही, हा संकल्प असून तो माझ्या आंदोलनाचाच एक भाग आहे. या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी काही पाऊल उचलले. जसे जिल्हाधिकारी व एसपी यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमली. विभागीय स्तरावर अधिकार दिले. परंतु कारवाई मात्र झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत भ्रष्टाचाऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आपला हा संकल्प कायम राहील, असेही ते म्हणाले.