गोपालकृष्ण मांडवकर
हिंगणा (जि. नागपूर) : विवेकसिंधू, लीळाचरित्र आदी ग्रंथ विदर्भातच उदयास आले. मुकुंदराज, लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वर यांच्या संतपरंपरेत वैदर्भीय रीती रूपांतरित होऊन देश्य साहित्याला तिने नामरूप दिले. कोणतीही मदत न घेता तत्कालीन संतांनी साहित्यातून ५ ते ७ राज्यांत मराठी भाषा पोहोचविली. सातवहन, वाकाटक व विदर्भातील राष्ट्रकूट या तीन राजवंशांचा इ.स. १ ते ८०० या काळातील इतिहास तपासला तर राजवंशाचे प्रकृत भाषेतील शिलालेख आणि साहित्यकृतीतून सादर झालेली महाराष्ट्र भाषा यातून हेच दिसेल. हा विचार केला तर मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये, असा प्रश्न ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांनी उपस्थित केला. (Vidarbha Sahitya Sammelan)
हिंगणा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय साहित्य संमेलनाला संत साहित्य आणि प्राचीन मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. मधुकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. संमेलनाचे उद्घाटन विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाले. पूर्वाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, स्वागताध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी उपस्थित होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात ते म्हणाले, हा मुद्दा कायदा व संविधानाशी संबंधित आहे. असे असले तरी भारतीय भाषा, भारतातील विविध प्रांत देश व त्यांच्या भाषा आणि भारताला जोडणाऱ्या भाषा हे चित्र नीट तपासले जावे. जे ग्रंथ, ग्रंथकार आणि त्यांच्या रचना या भूमीच्या प्राकृत धर्माशी, सांस्कृतिक जीवनधारेशी आणि मूल्यपरंपरेशी संबंधित आहेत. ते देश्य साहित्य असून, त्याच्या कक्षा केवळ एक प्रदेश वा एक प्रांत नसून संपूर्ण भारतवर्ष आहे. त्या परंपरेशी नाळ जोडणाऱ्या वैदर्भीय रीतीचा उद्घोष करणारे आहे. देश्य साहित्याची ही भूमिका मान्य केली, तर मराठी वाङ्मय क्षेत्रातील अनेक समस्यांची आणि प्रश्नांची उकल आपोआप होईल. विदर्भ साहित्य संघ त्यासाठी आग्रह धरणार आहे का, आपण यात कुठे कमी पडतो याचा विचार करणार आहे का, असा आव्हानात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, ग्रामीण अनुभव घेऊन येणाऱ्या लेखकांचे साहित्य कसदार आणि अनुभव संपन्न असते. यामुळे नवसाहित्यिकांचा सृजनाला आकार देण्यासाठी ग्रामीण भागात साहित्य संमेलने घडण्याची गरज आहे.