सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने विदर्भातील कापसाचे ५० टक्के पीक नष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता बीटी बियाणे भारतात आणणाऱ्या मोन्सॅन्टो इंडियाजवळ गुलाबी बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आहे की नाही असा प्रश्न देशातील २.५० कोटी कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा झाला आहे.
बीटी बियाणे कसे काम करते?कुठलाही जीव किंवा जीवाणू औषधांची प्रतिकारशक्ती स्वत:मध्ये तयार करीत असतो, हा निसर्ग नियम आहे. बीटी बियाणांचे तंत्रज्ञानही याच नियमावर आधारित आहे.बीटी बियाण्यांच्या ४५० ग्रॅम पाकिटासोबत १२० ग्रॅम नॉन-बीटी बियाण्यांचे पाकीटही मिळते. याला ‘रेफ्युज’ म्हणतात. दोन्ही शेतात जवळजवळ पेरायचे असतात. बीटी बियाण्यांच्या कपाशीच्या झाडावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यास रसायने बोंडअळ्यांना जगू देत नाहीत व ९० ते ९५ टक्के बोंडअळ्या त्वरित मरतात. परंतु नॉनबीटी/रेफ्युजच्या झाडांवर मात्र बोंडअळ्या वाढतात व त्यांचा बीटीच्या झाडांवरील न मेलेल्या ५ ते १० टक्के शिल्लक राहिलेल्या बोंडअळ्यांशी संयोग होऊन दुसºया पिढीच्या दुर्बल बोंडअळ्या तयार होतात व अशाप्रकारे कापसाच्या पिकाला बोंडअळीपासून संरक्षण मिळते. अशाप्रकारे ४-६ वर्षे हे चक्र चालते व नंतर उन्नयन (अपग्रेडेशन) करून जीवाणूंचे नवे तंत्रज्ञान विकसित होते, अशी माहिती माधवराव शेंबेकर यांनी दिली.
गुलाबी बोंडअळी फक्त भारतातब्राझील, अमेरिका या देशांमधील कापसाच्या पिकावर जी बोंडअळी येते तिला अमेरिकन बोलवर्म (बोंडअळी) म्हणतात. मोन्सॅन्टोने बीटीे हे तंत्रज्ञान बोलगार्ड-१ (बीजी-१) या नावाने अमेरिकन बोंडअळीसाठी विकसित केले व ते २००२ साली भारतात आणले. त्यामुळे गुलाबी बोंडअळीला २००६ पर्यंत आळा बसला पण नंतर प्रादुर्भाव वाढायला लागला, म्हणून मोन्सॅन्टोने बोलगार्ड-२ (बीजी-२) हे बीटी बियाणे २००६ साली भारतात आणले पण त्यानंतर कुठलेही उन्नत तंत्रज्ञान मोन्सॅन्टोने आणलेले नाही, अशी माहिती नॅशनल सीडस् असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष व नूझीविडू सीडस्चे प्रबंध संचालक एम. प्रभाकर राव यांनी दिली.
मोन्सॅन्टोची बाजूयासंबंधी संपर्क केला असता मोन्सॅन्टोचे मुख्याधिकारी सत्येंद्र सिंग यांनी मुख्य जनसंपर्क अधिकारी अरुण गोपाळकृष्णन यांचेकडे चेंडू टोलविला.गोपालकृष्णन यांनी २००६ नंतर बीटी बियाण्यांचे उन्नयन झाले नसल्याचे मान्य केले. पण पिकाची योग्य निगा राखली तर गुजरात, पंजाब इत्यादी १० राज्यात बोंडअळी बीजी-२ मुळे आटोक्यात राहण्याचा दाखला दिला. शेतकरी नॉन-बीटी रेफ्यूज न पेरता फक्त बीटी बियाणे पेरतात त्यामुळे ही समस्या उभी झाल्याचे सांगून शेतकऱ्यांवर ठपका ठेवला.
नवे तंत्रज्ञान आणण्यास नकारमोन्सॅन्टोने तंत्रज्ञान उन्नत का केले नाही? या प्रश्नावर गोपाळकृष्णन म्हणाले भारत सरकारने आम्हाला मिळणारे तंत्रज्ञान शुल्क (टेक्नोलॉजी फी) कमी केले आहे. पूर्वी आम्हास ९३० रुपयांच्या पाकिटावर १६३ रुपये तंत्रज्ञान शुल्क मिळत होते. सरकारने जानेवारी २०१७ मध्ये कॉटन सीड प्राईस कंट्रोल आॅर्डर आणली व बीटी बियाण्याची किंमत ८०० रुपये केली व आमचे तंत्रज्ञान शुल्क ४९ रुपये केले. एवढ्या कमी रकमेत आमचा संशोधनाचा खर्चही निघत नाही. याशिवाय सरकारजवळ बियाण्यांच्या बाबतीत कुठलेही स्थिर धोरण नाही त्यामुळे नवे तंत्रज्ञान आणण्यास मोन्सॅन्टो उत्सुक नाही असे गोपाळकृष्णन म्हणाले.मोन्सॅन्टोजवळ गुलाबी बोंडअळीचे तंत्रज्ञानच नाही म्हणून मोन्सॅन्टो माघार घेत आहे का? या प्रश्नावर गोपाळकृष्णन म्हणाले, आमच्याजवळ तंत्रज्ञान आहे पण ते भारतात आणण्याची आमची तयारी नाही.
मोन्सॅन्टोने नवे तंत्रज्ञान मागे घेतलेदरम्यान मोन्सॅन्टोने राऊंड अप रेडी फ्लेक्स (आरआरएफ) या नव्या तंत्रज्ञानाच्या चाचण्या पूर्ण केल्या होत्या व सरकारकडे अर्जही केला होता. पण २०१६ मध्ये आम्ही हा अर्ज परत घेतला आहे अशी माहिती गोपाळकृष्णन यांनी दिली.लोकमतने आरआरएफबद्दल चौकशी केली असता त्या तंत्रज्ञानाने, तणाचा नायनाट होतो. बोंडअळीचा नाही अशी माहिती शेंबेकर यांनी दिली. त्यामुळे बीजी-२ नंतर मोन्सॅन्टोजवळ गुलाबी बोंडअळीसाठी तंत्रज्ञान नाही हे पुन्हा अधोरेखित होते.
मोन्सॅन्टोने पेटंट नसताना तंत्रज्ञान शुल्क वसूल केलेयाबाबतीत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचेशीही लोकमतने चर्चा केली. त्यावेळी मोन्सॅन्टोजवळ बीजी-१ तंत्रज्ञानाचे पेटंट नसताना कंपनीने बियाणे कंपन्यांमार्फत ५००० कोटी तंत्रज्ञान शुल्क वसूल केल्याची माहिती शेखावत यांनी दिली, तर राधामोहन सिंह म्हणाले, ही रक्कम मोन्सॅन्टोकडून वसूल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
देशी बियाण्यांकडे परतावे लागणारमोन्सॅन्टोने नवे तंत्रज्ञान आणले नाही तर शेतकऱ्यांचे काय होईल यावर प्रभाकर राव म्हणाले देशी कपाशीच्या बियाण्यांकडे परत जाणे हाच यावर एकमेव उपाय आहे. तो कठीण आहे हे खरे पण कधी ना कधी तो करावाच लागेल.