एजी एन्व्हायरो कंपनीवर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील घराघरातून कचरा संकलन करून तो भांडेवाडी डम्पींगयार्ड येथे नेण्याची जबाबदारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. ए.जी. एन्व्हायरो कंपनीकडे लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर झोन क्षेत्रातील कचरा संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु या कंपनीचे कर्मचारी घरोघरी जात नाहीत. तसेच कचरा संकलन करणाऱ्या गाड्या दररोज येत नसल्याने या कंपनीवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांच्यासह नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
धंतोली झोनमधील जोशीवाडी, कुकडे ले-आऊट परिसरातील वस्त्यात घराघरातून कचरा संकलित केला जात नाही. कचरा गाडी चौकात उभी केली जाते. नागरिकांना चौकात जाऊन गाडीत कचरा टाकावा लागतो. तसेच कचरा संकलन करणारी गाडी दररोज न येता दोन दिवसांनंतर येते. वास्तविक कचरा उचलणाऱ्या कंपन्यांनी महापालिका प्रशासनासोबत केलेल्या करारानुसार दररोज घराघरातून कचरा संकलन करणे अपेक्षित आहे.
वास्तविक कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना घराघरातून कचरा संकलन करणे, पिकअप पॉईंटवर कचरा गोळा करून भांडेवाडी येथे नेण्याची जबाबदारी आहे. परंतु कंपनीकडून करारानुसार जबाबदारी पार पाडली जात नाही. यामुळे या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी अनिकेत कुत्तरमारे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.