आनंद डेकाटे ल्ल नागपूरमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मक्रांती केली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी आधुनिक तक्षशीला बनली आहे. जगभरातील लोकांचा ओढा दीक्षाभूमीच्या दिशेने वाढत आहे. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यास शासनाने ‘कंजुषी’ का दाखविली? असा संतप्त सवाल आंबेडकरी जनतेने केला आहे.राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आंबेडकरी जनतेचा हा सवाल केवळ भावनिक नाही तर त्याला ठोस कारणसुद्धा आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे ८ नोव्हेंबर १९९६ रोजी गृह विभागाने काढलेला शासन निर्णय हाती लागला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याबाबत निवड करण्यात येणाऱ्या ठिकाणांची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण करून त्या तीन याद्या महाराष्ट्र विकास महामंडळाने तयार कराव्यात, असे स्पष्ट केले आहे. तसेच अ, ब व क श्रेणीमध्ये निवड करण्यासाठी नियमावलीसुद्धा दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीची ठिकाणे, केंद्र शासन व परराष्ट्रांकडून मिळणाऱ्या अर्थसाहाय्याने विकसित करण्यात येणारी ठिकाणे यांचा समावेश ‘अ’ श्रेणीमध्ये करण्यात यावा, असे शासन निर्णयात म्हटले आहे. काय म्हणतो शासन निर्णय ४शासन निर्णयानुसार ‘अ, ‘ब’ व ‘क’ श्रेणीसाठी कोणत्या स्थळांची निवड करावी हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ‘अ’ श्रेणीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीची ठिकाणे आणि परराष्ट्रांकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याने विकसित करण्यात येणारी ठिकाणे यांचा समावेश राहील. दीक्षाभूमी हे या दोन्ही पातळीवर तंतोतंत उतरणारे ठिकाण ठरते. दीक्षाभूमी हे एक बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटक दीक्षाभूमीला भेटी देण्यासाठी येतात. बौद्ध, तीर्थक्षेत्र असल्याने बौद्ध राष्ट्रांकडून दीक्षाभूमीच्या विकासासाठी निश्चित मदत घेता येऊ शकते.
दीक्षाभूमीला ‘अ’श्रेणी का नाही ?
By admin | Published: August 25, 2015 3:57 AM