नागपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे आगमन जवळ आल्यावरच नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येते. सध्या त्यांनी फुटाळा तलावाच्या पाण्यातील कचरा व घाण साफ करण्यास प्रारंभ केला आहे, ही आनंदाची बाब असली तरी शहरवासीयांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला हा तलाव वर्षभर स्वच्छ का ठेवला जात नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत पवार यांनी केला आहे. गणेशउत्सवानिमित्त गणेशभक्त तलावावर विसर्जनासाठी मोठ्या संख्येने येतील तेव्हा महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराचे प्रदर्शन नागपूरकरांना होईल, या भीतीपोटीच फक्त महापालिकेने फुटाळा तलावाची थातूरमातूर साफसफाई चालविली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काठावरच्या पाण्यावर तरंगत असलेला कचरा अणि गवत काढून ते काठावरच टाकून देण्यात आले आहे. पुढे हाच कचरा पुन्हा तलावात जाण्याचा धोका आहे, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. संपूर्ण तलावात मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार झाले असून, गवत वाढले आहे. त्यामुळे पाणी प्रदूषित झाले असून, तलावातील जलचरांना धोका निर्माण झाला आहे. याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. गणपती उत्सव असो अथवा नसो, महापालिकेने शहरातील सर्व तलावांची विनाविलंब सफाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. ़(प्रतिनिधी)
फुटाळा तलाव स्वच्छ का ठेवला जात नाही ?
By admin | Published: August 28, 2014 2:04 AM