लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशात ११ कोटींहून अधिक वनवासी व आदिवासी नागरिक आहेत. आदिवासी क्षेत्रांत आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे व तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाही, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी उपस्थित केला. संघाच्या अजनी विभागातर्फे ‘सेवादर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.तुकाराम सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे, लोककल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, अजनी भाग संघचालक सुभाष देशकर प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तर नियुक्त करण्यात येतात, मात्र ते तेथे जातच नाहीत. एकाच दिवशी जाऊनमहिनाभराच्या सह्या मारण्याचे प्रकारदेखील दिसून येतात. शिक्षण क्षेत्रातदेखील अशीच अवस्था आहे. शाळा आहेत, पण शिक्षण नाही, असे चित्र आहे. समाजातील भटके लोक, गरीब, आदिवासी, अस्पृश्य यांच्या सेवेसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना पैशाची कमतरता भासत नाही, मात्र काम करणाºयांची जास्त प्रमाणात गरज आहे. लोककल्याण समिती हा मार्ग मिळवून देते, असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले. वीरेंद्र मल्होत्रा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अजनी भागात चालणारे विविध सेवाप्रकल्प, सेवाव्रती तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचे काम तसेच ज्यांना या कार्यामुळे लाभ झाला, अशा विविध लोकांनी आपले मनोगत मांडले तर लहान मुलांनी जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. सुजाता सरागे आणि वैशाली बोबडे यांनी संचालन केले.सेवेचे विषय भाषणाचा नाहीयावेळी भय्याजी जोशी यांनी सेवा नेमकी कशी करावी, यावर प्रकाश टाकला. भाषणे देणे किंवा कथा सांगणे हा सेवेचा विषय नाही. सेवा करताना अडचणीतून जाण्याची तयारी हवी. सेवा म्हणजे निधी गोळा करण्याचादेखील विषय नाही. ज्यांच्यासाठी काम करायचे आहे, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. असे केले तरच कामाचा आनंद मिळेल, निराशा येणार नाही व आपुलकीतूनच परिवर्तन घडल्याचे दिसून येईल, असे मत भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.