लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना संक्रमण वाढले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, सोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविले असून, दररोज २५ हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात असल्याचा दावा केला आहे. मात्र वास्तव वेगळे आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या विचारात घेता, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा घरोघरी सर्वेक्षण करून पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेऊन होम आयसोलेशनची व्यवस्था नसल्यास अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्याची गरज आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या व मनुष्यबळ विचारात घेता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्य प्रकारे होत नसल्याचे चित्र आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे अपेक्षित आहे. मात्र असे होताना दिसत नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनपाच्या १५१ चमू आहेत. शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे. याचा विचार करता शहरातील सहा लाख लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे अपेक्षित आहे. परंतु असे होताना दिसत नाही.
....
गेल्या वर्षी झाले सर्वेक्षण
गेल्या वर्षी शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले होते. यात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची व्यवस्था नसल्यास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले होते. यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यास मदत झाली होती.
...
ताप, ऑक्सिजनची तपासणी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात पथकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची गरज आहे. या सर्वेक्षणात ताप आणि ऑक्सिजन तपासणी तसेच कोरोनाची लक्षणे आहेत का, याचा शोध घेण्याची गरज आहे.