नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचे पीएच (पोटेंशियल ऑफ हायड्रोजन) मूल्य का कमी होत आहे? याचा अभ्यास करून यावर आवश्यक उपाययोजना करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी लोणार सरोवर संवर्धन समितीला दिले.
यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. एस. एस. सन्याल यांनी भूजल विभागाच्या अहवालाकडे न्यायालयाचे लक्ष वेधून जानेवारी-२०२३ मध्ये लोणार सरोवरातील पाण्याचे मूल्य ८.०९ ते ९.७८ यादरम्यान आढळून आले, अशी माहिती दिली. तसेच, पाण्याकरिता ७ पीएच मूल्य योग्य समजले जाते, असे सांगितले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सदर निर्देश दिले.