मुंबई : नवीन फिल्म सिटी नोएडा येथे बनविण्यात येत आहे. ही फिल्म सिटी हिंदुस्तानात बनत आहे, कराचीमध्ये नाही. अशावेळी शिवसेना संतप्त का होत आहे, असा सवाल खासदार आणि चित्रपट अभिनेता रविकिशन यांनी उपस्थित केला आहे.
माजी खासदार आणि लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी मुलाखतीदरम्यान रविकिशन म्हणाले, देशात मुंबईव्यतिरिक्त नवीन फिल्म सिटी होत असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. ही तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे चित्रपटाचा विकासच होणार आहे. यावर शिवसेनेने अनावश्यक बोंबाबोंब करू नये. नोएडा फिल्म सिटी सर्वात मोठी आणि अत्याधुनिक होणार आहे. या फिल्म सिटीत मराठी चित्रपट निर्मितीसाठी ७५ लाख ते १.५ कोटींपर्यंत अनुदानसुद्धा मिळणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुंबई फिल्म क्षेत्रातील मान्यवरांना भेटणे म्हणजे त्यांची आवश्यकता समजणे, हा मुख्य उद्देश आहे. नोएडा फिल्म सिटीला त्यांच्या आवश्यकतेनुरूप बनविण्यात येणार आहे.