आपल्याच महान नेत्याचा विसर पडावा, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. अशीच भावना वर्तमान सरकारच्या धोरणाविषयी निर्माण होत आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी १९६२च्या त्या काळात महाराष्ट्र काँग्रेसची मुख्य धुरा सांभाळणारे निष्ठावंत लोकनेते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब उपाख्य मा. सा. कन्नमवार होते. विदर्भ विकास करणे आणि संयुक्त महाराष्ट्राला समोर नेण्याचे कार्य दादासाहेब यांनी केले. २४ नोव्हेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचा स्वर्गवास झाला.
तेव्हापासून आजतागायत सरकारने दादासाहेब कन्नमवार यांची शासकीय, निमशासकीय स्तरावर १० जानेवारीला जयंती व २४ नोव्हेंबरला स्मृतिदिन साजरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. २०१७ पासून बेलदार समाज संघर्ष समिती, २०१८ पासून दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. त्याच अनुषंगाने यावर्षी २०२०च्या शासकीय दिनदर्शिका आदेशात दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती व स्मृतिदिनाच्या आदेशाची अपेक्षा होती. समाजकल्याण खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे व भटक्या विमुक्तांचे खाते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्याकडे तर संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून दादासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची दानत या सरकारमध्ये असेल असे वाटले होते. मात्र, २०२०च्या आदेशात सरकारकडून निराशाच पदरी लाभलेली आहे. त्यामुळे बेलदार समाज व कन्नमवार साहेब प्रचार प्रसार समितीचे कार्यकर्ते सरकारवर नाराज का होऊ नये, अशी भावना आहे. ही नाराजी कार्यकर्ते राजेंद्र बढिये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. गजानन चंदावार यांनीही धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा करून पाठपुरावा घेतला आहे. तर मी स्वत: राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशू व दुग्ध मंत्री सुनील केदार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. दादासाहेब कन्नमवार यांचा जयंती व स्मृतिदिन शासकीय व निमशासकीय स्तरावर साजरा व्हावा, यासाठी पुन्हा जोरकस प्रयत्न संघटनेच्या वतीने सुरू केले आहेत.
- मुकुंद अडेवार : दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र