साध्या जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णयही दिल्लीत का व्हावा? - शशी थरूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 12:13 PM2022-10-03T12:13:10+5:302022-10-03T12:38:54+5:30
निर्णयातही विकेंद्रीकरणाची गरज
नागपूर : पक्षाचा जिल्हाध्यक्ष निवडण्याचा निर्णय दिल्लीत का व्हावा? साध्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीत थेट राष्ट्रीय अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागत असेल तर ते योग्य नाही. अलीकडे पक्षातील कोणताही विषय असाे त्याचा निर्णय हायकमांड घेईल, अशी एक नोट जारी केली जाते. ही प्रथा बंद व्हावी, निर्णय प्रक्रियेचेही विकेंद्रीकरण व्हावे, अशी अपेक्षा कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केली.
या बदलासाठीच आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शशी थरूर हे अ. भा. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. याअंतर्गत त्यांनी रविवारी प्रेस क्लब येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. शशी थरूर म्हणाले, एकेकाळी प्रत्येक राज्यात मजबूत नेते होते. त्यांच्यामुळेच पक्षही मजबूत होत गेला. राज्यात अध्यक्ष आहेत. पण त्यांच्यावर जनरल सेक्रेटरी बसले आहेत. कोणताही निर्णय हायकमांड घेईल असे सांगितले जाते. हे बरोबर नाही. स्थानिक स्तरावरील नेत्यांना निवडीचे अधिकार असावे, ते योग्य निवड करतील, असा विश्वास त्यांच्यावर असावा. मन की बात खूप झाली, आता जन की बात ऐकली जात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यासाठीच आहे. यासोबतच सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज ऐकण्याचीही गरज आहे. त्यासाठीच माजी उमेदवारी आहे.
आपला देश युवकांचा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षही युवकांचा व्हावा. युवकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार आशिष देशमुख, गिरीष गांधी, ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद, कृष्णकुमार पांडे, दिनकर राऊत, सुमित भालेकर, किशोर जिचकार, सरफराज खान, शादाब शेख आदी उपस्थित होते.