लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील वातावरण हे पाश्चिमात्य धार्जिणे ठेवण्यावरच भर देण्यात आला. अमेरिका, युरोपमध्ये एखाद्या गोष्टीला मान्यता मिळत असेल तरच त्यासाठी पुढाकार घेण्याकडे राजकारण्यांचा कल होता. यातूनच देशातील अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या त्यागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर देशासाठी प्रचंड त्याग केला. परंतु त्यांनादेखील युरोप व अमेरिकेत मान्यता का मिळू शकली नाही, असा प्रश्न प्रसिद्ध लेखक अनुज धर यांनी उपस्थित केला. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.आजच्या काळात जर तरुण पिढीपर्यंत स्वातंत्र्यसेनानींचे योगदान पोहोचवायचे असेल तर सिनेमा हे सर्वोत्तम माध्यम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी प्रचंड छळ सहन केला. मात्र त्यांचादेखील जाहीरपणे अपमान होतो. कुठल्याही स्वातंत्र्यसेनानीचा अशाप्रकारे अपमान करणे योग्य नाही.योगी आदित्यनाथांना नेताजींमध्ये रस नाहीअखिलेश यादव उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘गुमनामी बाबा’ यांच्याशी संबंधित साहित्य व जीवनावर प्रकाश टाकणारे संग्रहालय बनविण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बहुतेक नेताजींच्या जीवनामध्ये रस नाही. म्हणूनच त्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचललेली नाही, असे अनुज धर यांनी सांगितले.‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचे पुरावेदरम्यान, अनुज धर यांनी गुरुवारी ‘मंथन’तर्फे आयोजित ‘इन्साईड सुभाष बोस मिस्ट्री’ या विषयावर व्याख्यान दिले. सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैपेईमध्ये विमान दुर्घटनेत झाला नव्हता. तर त्यानंतरही ते ‘गुमनामी बाबा’ बनून राहिले. ‘गुमनामी बाबा’ यांच्या निवासस्थानी मिळालेले पुरावे हेच स्पष्ट करणारे आहेत, असा दावा अनुज धर यांनी केला. सुभाषचंद्र बोस यांचे सत्य समोर यावे ही देशवासीयांची इच्छा होती. मात्र शासनकर्त्यांनी कधीच ही बाब मनावर घेतली नाही. पं.जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात नेताजींच्या कुटुंबीयांवर २० वर्षे पाळत ठेवण्यात आली होती व त्याचे पुरावेदेखील उपलब्ध आहेत. सरकारलादेखील बोस जिवंत असल्याची माहिती होती.‘गुमनामी बाबा’ हे अयोध्या, नीमसर, फैजाबाद, लखनौ व बस्ती येथे राहिले. ते भगवानजी म्हणून ओळखले जायचे व त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करणारे पत्र लिहीले होते. जर सरकारला नेताजींबाबत जाणून घेण्याची इच्छा होती तर ‘डीएनए’ चाचणीच्या माध्यमातूनदेखील ते शक्य होते. ‘गुमनामी बाबा’ व सुभाषचंद्र बोस यांचे हस्ताक्षर एकच असल्याचा निष्कर्ष ‘फॉरेन्सिक’ तज्ज्ञांनी दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी माहिती अनुज धर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन अंकिता देशकर यांनी केले तर रसिका जोशी यांनी आभार मानले.