नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वजन कमी करण्याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी ‘शुगर फ्री स्वीटनर्स’चा (गोडवा निर्माण करणारे पदार्थ) वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे मधुमेह, हृदयविकार होऊन पुरुषांमध्ये मृत्यूदर वाढण्याचा धोका असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
आरोग्य संघटनेने दिला धोक्याचा इशारा
‘डब्ल्यूएचओ’ने साखरेऐवजी ‘नॉन-शुगर स्वीटनर्स’च्या वापराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यानुसार, या ‘शुगर फ्री स्वीटनर्स’ वापरामुळे प्रौढ किंवा मुलांच्या शरीराचे वजन कमी करण्यात दीर्घकाळ कोणताच फायदा होत नाही. तथापि, यामुळे वजन किरकोळ कमी होते; पण ते अधिक काळ कायम राहत नाही. एवढेच नाही, तर याच्या वापरामुळे ‘टाइप-२’ मधुमेह, हृदयविकाराचा धोका आणि प्रौढांमध्ये मृत्यू दर वाढू शकतो.
वजन कमी करण्यासाठी काय कराल?
नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ खा
लोकांनी इतर पयार्यांचा विचार केला पाहिजे. जसे की, ज्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या गोडवा असतो अशा पदार्थांचे सेवन करावे. उदाहरणार्थ फळे किंवा गोड नसलेले अन्न आणि पेय पदार्थ. ‘डब्ल्यूएचओ’चे संचालक (न्यूट्रिशन अँड फूड सेफ्टी) फ्रान्सिस्को ब्रान्का यांच्या मते, ज्यांना आधीपासून मधुमेह नाही त्या सर्वांसाठी हा सल्ला लागू आहे.
संतुलित आहार घ्या
न्युट्रिशनिस्ट वजन कमी करण्यासाठी आणि स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्लेटच्या एक चतुर्थांश भागामध्ये प्रोटिन, एकामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि उर्वरित अर्ध्या भागामध्ये भाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत. याशिवाय एक किंवा दोन चमचे गुड किंवा हेल्दी फॅट असणे देखील महत्त्वाचे आहे. ज्यांना मधुमेह नाही त्यांच्यासाठी हा सल्ला आहे.
नियमित व्यायाम महत्त्वाचा
आहारावर नियंत्रण आणि नियमित व्यायामाने वजन कमी करता येऊ शकते. व्यायाम हा कॅलरी कमी करण्याचा आणि स्नायू बळकट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. धावणे आणि वजन कमी करणे हे एकमेकांना पूरक आहे. त्यासाठी ट्रेडमिलची आवश्यकता नाही; पण जर तुम्ही कधी व्यायाम केला नसेल तर तुम्ही सुरुवात गतीने चालण्यापासून करा आणि नंतर हळूहळू धावण्याला सुरुवात करा; परंतु व्यायाम सुरू करताना एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.
‘टाइप-२’ मधुमेहाची जोखीम वाढू शकते
कृत्रिम गोड पदार्थ इन्शुलिनची पातळी आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणात व्यत्यय आणू शकतात. कृत्रिम स्वीटनर्स साखरेपेक्षा गोड, परंतु कॅलरीजशिवाय डिझाइन केलेले असतात. यामुळे गोड पदार्थांचे अतिसेवन होण्याचा धोका होऊ शकतो. ज्यामुळे वजन वाढू शकते. ‘टाइप-२’ मधुमेहाची जोखीम वाढू शकते. इतरही आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
- डॉ. सुनील गुप्ता, मधुमेहतज्ज्ञ