नरेश डोंगरे!लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हाथरस बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणामुळे पुन्हा एकदा देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवू, दोषींना कठोरात कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा केली जाईल, अशी घोषणा होईल. प्रत्यक्षात पीडित परिवाराला तातडीने न्याय मिळणार नाही. होय, ही सर्वसामान्यांची भावनाच नाही तर यापूर्वीच्या अशाच घटनांतून आलेला त्यांचा अनुभव आहे.हाथरस प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. देशात यापूर्वी दिल्लीच्या निर्भया आणि हैदराबादच्या प्रकरणानेही अशीच संतापाची लाट निर्माण केली होती. नागपुरात मोनिका किरणापुरे, कांचन मेश्राम, सानिका थुगावकर तर हिंगणघाट (वर्धा) मध्ये अंकिता जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळवली होती. प्रत्येक वेळी उफाळून आलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी ‘या प्रकरणाचा’ तातडीने निकाल लावू, आरोपींना फासावर टांगू, अशी भाषा वापरण्यात येते. प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. राजकीय घोषणांच्या पुरात पीडित परिवाराचे अश्रु वाहून जातात. कोर्टकचेऱ्यामध्ये तारखांच्या बांधावर न्याय अडकतो. महिनोन्महिने या केसच बोर्डावर येत नाहीत. एखाद्या प्रकरणात शिक्षा सुनावली तरी त्याची वर्षानुवर्षे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच गुंड निर्ढावतात. देशभर खळबळ उडवून देणाºया नागपूर विदर्भातील खालील तीन प्रकरणातून त्याची प्रचिती यावी.१ जुलै २०१८ च्या रात्री ७.४५ च्या सुमारास आरोपी हेमनानीने सानिकाला तिच्या मामाच्या कार्यालयात गाठले. ‘तू माझ्याशी संबंध का तोडले’ असा प्रश्न करीत त्याने तिच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे सपासप घाव घालून तिला संपविले होते. आता या प्रकरणाला अडीच वर्षे झाली. अद्याप या प्रकरणात आरोपीला शिक्षा झालेली नाही.१८ डिसेंबर २००५ ला लोणारा (कळमेश्वर)च्या कांचन मेश्रामला राकेश मनोहर कांबळे आणि अमरसिंग किसनसिंग ठाकूर या नराधम गुंडांनी तिच्या नातेवाईकांसमोरून उचलून नेले. उभा गाव जमा झाला असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिची शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली होती. न्यायालयाने जून २०१३ मध्ये त्यांना फाशीची सुनावली. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.३० दिवसांत न्याय !हिंगणघाटच्या अंकिता नामक प्राध्यापिकेला ३ फेब्रुवारी २०२० ला नराधम विकेश नगराळे याने जिवंत पेटवले होते. या जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळली होती. संतप्त लोकभावना लक्षात घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायद्याचा अभ्यास करून या जळीत कांडातील क्रूरकर्म्याचा ३० दिवसांच्या आत कायदेशिर निकाल लावण्याचे प्रयत्न केले जातील. जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) हा खटला चालवून मृत अंकिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र असे काहीही झाले नाही. हे प्रकरण हिंगणघाटच्या सत्र न्यायालयात पडून आहे. दोषारोपपत्र दाखल होऊन १८० दिवस झाले परंतू त्याची अद्याप सुनावणीही सुरू झालेली नाही.
म्हणूनच निर्ढावतात क्रूरकर्मे आणि घोषणांच्या पावसात अश्रू जातात वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:54 AM
Hathras, Gang rape, Nagpur News हाथरस प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. देशात यापूर्वी दिल्लीच्या निर्भया आणि हैदराबादच्या प्रकरणानेही अशीच संतापाची लाट निर्माण केली होती.
ठळक मुद्देशिक्षा तर दूरच, सुनावणीलाही सुरुवात नाही