नागपूर: महिलांना राजकीय आरक्षण लागू झाल्यावर २०२९ मध्ये अनेक गोष्टी बदललेल्या दिसतील. केवळ महिला आहे म्हणून उमेदवारीचा आग्रह धरणे योग्य नाही. ज्या महिलेत जिंकण्याची क्षमता असेल व राजकीय कौशल्य असेल तिलाच तिकीट मिळायला हवे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. भाजपतर्फे राज्यात पुढील दोन महिन्यांत शक्तीवंदन मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याच्या बैठकीसाठी त्या नागपुरात आल्या असता शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान त्या बोलत होत्या.
महिलांना उमेदवारी मिळायला हवी यात दुमत नाही. मात्र ती महिला आहे म्हणूनच तिला उमेदवारी का द्यावी. जर संबंधित महिलेत जिंकण्याची क्षमता असेल तरच उमेदवारी द्यायला हवी. महिला राजकीय आक्षरण २०२९ च्या निवडणूकीत लागू होईल. भाजपकडे केंद्रीय पातळीपासून ते अगदी बुथपर्यंत कर्तुत्ववान महिला आहेत. त्यामुळे भाजपला अनेक महिला उमेदवार मिळतील. मात्र इतर पक्षांना महिला उमेदवार शोधाव्या लागतील. २०२९ मध्ये अनेक नवीन राजकीय चेहरे पहायला मिळतील, असेदेखील त्या म्हणाल्या.
शक्तीवंदन मोहिमेअंतर्गत शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजनांची माहिती पोहोचविण्यात येईल. तसेच गृहसंपर्क मोहिमेदरम्यान महिलांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत तेदेखील जाणून घेण्यात येईल. निवडणूकीत महिलांचा मौलिक सहभाग राहणार आहे. त्यामुळे मतदानाबाबतदेखील त्यांच्यात जागृती निर्माण करण्यात येईल, असे वाघ यांनी स्पष्ट केले.
-रश्मी ठाकरेंना शुभेच्छा, अगोदर काय केले ?रश्मी ठाकरे यादेखील महिलांमध्ये जाऊन संवाद साधणार असल्याबाबत वाघ यांना विचारणा करण्यात आली. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांना त्यासाठी शुभेच्छा. मात्र अडीच वर्ष सत्तेत असताना त्या जनतेत गेल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असा चिमटा वाघ यांना काढला.