नागपूर : अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. असे असताना नुकसान भरपाईतून नागपूर जिल्ह्याला का वगळण्यात आले, असा सवाल करीत जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, कृषी सभापती प्रवीण जोध, सभापती राजकुमार कुसुंबे, महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, समाजकल्याण सभापती मिलिंद सुटे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांनी निषेधाचे फलक हाती घेत गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाने त्रस्त आहे. अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी पिकाचे मोठे नुकसान झाले. कापणीला आलेला गहू, हरभरा, तूर भिजली. पावसाच्या पाऱ्यामुळे कापसाचे बोंड गळले व माती मिश्रित झाल्याने गुणवत्ता घटली. शासकीय पातळीवर पंचनामे झाले असताना मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यानंतरही नुकसान भरपाईतून नागपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. यानंतर शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
आंदोलनात माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, मनोहर कुंभारे, उज्ज्वला बोधारे, अरुण हटवार, दुराम सव्वालाखे, नेमावली माटे, प्रकाश खापरे, सुनीता ठाकरे, अर्चना भोयर, देवानंद कोहळे, रुपाली मनोहेर, दिशा चानकापुरे, मंगला निंबोने, महेंद्र डोंगरे, विष्णू कोकड्डे, चेतन देशमुख, स्वप्नील देशमुख आदींनी भाग घेतला.