झलके यांचा आयुक्तांना सवाल : निधी रोखण्यावरून पदाधिकारी-आयुक्तात संघर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुढील वर्ष निवडणुकीचे असल्याने प्रभागातील विकास कामासाठी नगरसेवक फाईल घेऊन फिरत आहेत. परंतु साधी लाख-दोन लाखाची गडरलाईनची कामेही होत नाही. महापालिकेच्या अर्थसंकल्पात अत्यावश्यक कामासाठी तरतूद केली. असे असूनही निधी उपलब्ध होत नसल्याने विकास कामे ठप्प आहेत. यामुळे नाराज असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांना पत्र पाठवून विकास निधी रोखण्याचा अधिकार आपणास कोणत्या कायद्याने दिला, अशी विचारणा केली आहे. या पत्रामुळे पदाधिकारी व आयुक्त यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
झलके यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि त्यातील पोटकलमाचे दाखलेही दिले आहेत. स्थायी समितीने खर्च न केलेल्या अर्थसंकल्पीय अनुदान यावर्षीच्या अर्थसंकल्पात अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. ती रोखली आहे. याचा अधिकार आहे का? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कुठल्या कायद्यान्वये तुम्हाला हे अधिकार प्राप्त आहेत, याचाही खुलासा करण्याची मागणी केली आहे.
सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प मंजूर केला. विविध पदाअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीस मान्यताही दिली आहे. त्यात बदल करण्याचा अधिकार मनपा सभागृहाला आहे. असे असताना स्थायी समिती व सभागृहाची कोणतीही परवानगी न घेता अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करण्यास निर्बंध घातलेले आहे. यात बदल करायचे असल्यास महानगरपालिका प्रकरण ७ मधील पोटकलम २ अन्वये ज्या ज्या स्पष्टता दिलेल्या आहेत त्याचेही कृपया अवलोकन करावे, असाही सल्ला झलके यांनी आयुक्तांना दिला आहे.
...
नागरिकांना वेठीस धरू नका
शहराच्या अनके वस्त्यात रस्त्यावरून वाहणारे पाणी, तुंबलेली गटारे, उखडलेले फूटपाथ, अर्धवट झालेली सिमेंट रोडची कामे, तुटलेली बाके यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र आयुक्त म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात, असा थेट आरोपही झलके यांनी आयुक्तांवर केला. लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिक आपल्या समस्या घेऊन नगरसेवक तसेच मनपा पदाधिकाऱ्यांकडे येतात. निधी नसल्याने आम्ही त्यांचे निराकरण करू शकत नाही. प्रशासन समस्या सोडवण्यास तयार नाही. शहरातील नागरिकांना वेठीस धरू नका, असेही झलके यांनी आयुक्तांना म्हटले आहे.
....
प्रशासन व पदाधिकारी दोन चाके
प्रशासन व पदाधिकारी ही मनपाची दोन चाके आहेत. यातील एक चाक जरी खराब झाले तरी गाडी योग्यरीत्या चालणार नाही. प्रशासनाची गाडीही योग्य दिशेने चालणार नाही, असा सल्लाही झलके यांनी आपल्या पत्रातून दिला आहे.