लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशोधरानगर आणि कलमना ठाण्यांतर्गत येणाऱ्या अनेक भागात सरकारी धान्याचा काळाबाजार सर्रास सुरू आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून काळाबाजार होत आहे. या व्यवहाराची अन्न व पुरवठा विभागाला माहिती असतानाही अधिकारी चुप्पी साधून आहेत. काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी पुढे धजावत नाहीत. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे.
यशोधराचे राजीव गांधीनगर, फुकटनगर आणि कळमन्याच्या चिखलीसह लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात किरकोळ खरेदीदार या कामासाठी सक्रिय आहेत. हे खरेदीदार रेशन केंद्र आणि कार्डधारकांकडून ब्लॅकमधून १० रुपये किलो तांदूळ आणि १२ ते १३ रुपये किलो गहू खरेदी करतात. धान्य खरेदी करण्यासाठी त्यांची ठोक विक्रेत्यांसोबत साटेलोटे आहे. या खरेदीदारांच्या संपर्कात असणारे ठोक विक्रेते या धान्याला मार्केट दरापेक्षा कमी दरात खरेदी करतात. सरकारी धान्याच्या काळाबाजारीचे धागेदोरे दूरवर पसरले आहेत. कार्डधारकांकडून त्यांच्या घरी जाऊन धान्य खरेदी करीत करतात आणि रात्री रेशन केंद्रांवरून या धान्याचा पुरवठा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेशन केंद्रांवर कार्डधारकांना २ रुपये किलो दराने सरकारी धान्य मिळते, हे उल्लेखनीय. कोरोना काळात पंतप्रधान योजनेंतर्गत कार्डाच्या प्रत्येक व्यक्तीला तांदूळ आणि गहू मिळाला. त्या धान्याचाही मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याची माहिती आहे. त्यावरही आर्थिक व्यवहारामुळे अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याचे सूत्रांनी सांगितले.