लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सप्टेंबर महिन्यातला तिसरा रविवार हा वाईफ अॅप्रिसिएशन डे म्हणून पाश्चात्त्य राष्ट्रांत साजरा केला जातो. यामागे असलेला उद्देश हा जोडप्यांमधील जिव्हाळ्याचे बंध अधिक दृढ व्हावेत व पत्नीचे मन आनंदी रहावे. आजच्या दिवशी तिला तिच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून देणे, तिला फिरायला नेणे वा तिच्यासोबत हास्यविनोदात वेळ घालवणे या बाबी पतीकडून अपेक्षित असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत असा दिवस साजरा करण्याला कदाचित विरोधाचा सूर लागू शकतो पण त्यामागचा हेतू मात्र नाकारला जाऊ शकत नाही.तिला हवेत फक्त दोन शब्द ... कौतुकाचे!ज्येष्ठ वैवाहिक समुपदेशक निलिमा किराणे यांच्या मते, मैत्रिणीला किंवा प्रेयसीला खूष कसं ठेवायचं ते मित्रांना / पुरुषांना खूप चांगलं कळतं. मैत्रिणीची मनापासून काळजी घेणारा, तिच्या कुठल्याही गोष्टीवर खूष होणारा आणि प्रेमाने कौतुक करणारा मित्र, लग्न करून नवरा झाल्यानंतर मात्र एकदम बदलतो. आई-वडील, घर, समाज यांच्या अपेक्षा तिच्यावर प्रोजेक्ट करायला लागतो. त्यातल्या काही ती पूर्ण करू शकते, काही नाही जमत. मग कधी तो नाराज, कधी ती नाराज. पण तरी प्रेम असतंच मनात. प्रत्येक क्षणाला त्यालाच मनात ठेऊन, त्याच्याचसाठी करत असते ती परक्या घरातलं सगळं. तो मात्र आपल्या कामात, गोतावळ्यात मग्न असतो.आपली प्रेमाने काळजी घेणारा आणि आपण त्याच्यासाठी स्पेशल आहोत असं क्षणोक्षणी दाखवणारा तो मित्र कुठे हरवला ते तिला कळतच नाही. वर्षानुवर्ष ती नवऱ्यामध्ये त्याला शोधत राहते. तो सापडत नाही तेव्हा नाराज होत राहते. प्रेम करतो म्हणूनच घरात कायमची आणली ना तिला? तिच्याचसाठी कष्ट करतोय, कमावतोय ना? तरी ही नाराज का?आणखी काय करायला हवं मी? हे त्याला कळतच नाही. का ते न कळताच संसारातली मजा आटत जाते.खरं तर लग्नापूर्वी तिच्यासाठी तो जे करत होता, ज्यासाठी तिचं लाड करणारं माहेर सोडून ती त्याच्याकडे आली, त्यातलंच कणभर त्यानं आत्ताही करायला हवं. ती अजूनही त्याच्यासाठी तशीच स्पेशल आहे याची, त्याच्या प्रेमाची खूण तिला अधूनमधून पटवत राहायला हवी. त्यानं तिचं अगदी थोडंसं, चार दोन शब्दांत, पण मनापासून कौतुक करायला हवं. ज्यानं तिला कळेल, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. त्याला आपली किंमत आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्याला आपण आवडतोय.
खरं तर सात पर्वत, सात समुद्र ओलांडून मिळवून आणायला लागावी, इतकाही सुखी संसाराची वाटचाल अवघड नसते. नवऱ्यानं फक्त पुन्हा प्रियकराच्या मनात प्रवेश करायला हवा. लग्नापूर्वी तिला मिळवण्यासाठी तो जे वागत होता, त्यामुळे ती इतकी आनंदात होती, की तिचे लाड करणारं माहेर सोडून ती त्याच्याकडे आली होती. तिला आनंदी ठेवण्याची ती कला त्यानं पुन्हा एकदा आठवायला हवी. ती अजूनही त्याच्यासाठी तशीच ‘स्पेशल’ आहे याची, त्याच्या प्रेमाची खूण तिला अधूनमधून पटवत राहायला हवी. त्यानं एवढंच समजून घ्यायला हवं, की ती ‘फक्त त्याच्यासाठी’ आली होती. त्याच्यासोबत आलेलं सगळं तिनं फक्त ‘त्याचं’ आहे म्हणून स्वीकारलं आहे. आता या सगळ्या गोतावळ्यात तोच दिसेनासा झाला, तर तिचं येणंच निरर्थक होऊन जातं, याचं भान ठेवायला हवं. तिचं असणं गृहीत न धरता, अगदी थोडंसं, चार दोन शब्दांत, पण ‘मनापासून’ तिचं कौतुक करायला ह्वं. ज्यानं तिला कळेल, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. त्याला आपली किंमत आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्याला आपण आवडतोय. मग तिच्याही आयुष्यात अर्थ येईल.