पतीला गलिच्छ शिवीगाळ करणारी पत्नी क्रूरच; हायकोर्टाचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 08:26 PM2019-12-04T20:26:56+5:302019-12-04T20:27:17+5:30
पतीस गलिच्छ शिवीगाळ करणाऱ्या, आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या व छोट्या-छोट्या गोष्टींवरून आकांततांडव करणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने क्रूर ठरवून घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीस गलिच्छ शिवीगाळ करणाऱ्या, आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या व छोट्या-छोट्या गोष्टींवरून आकांततांडव करणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने क्रूर ठरवून कुटुंब न्यायालयाचा घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.
२८ डिसेंबर २०१५ रोजी कुटुंब न्यायालयाने पती राहुलला पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला होता. त्याविरुद्ध पत्नी निताने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता निताचे अपील फेटाळून लावले. या दोघांचे २ जानेवारी २००५ रोजी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. राहुलने लग्नानंतर काही दिवसांनी आई-वडिलांना भेटायला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून निताने आकांततांडव केला. राहुलसोबत बोलने सोडून दिले. ती सासरच्या मंडळींना योग्य वागणूक देत नव्हती. ती बाळंतपण झाल्यानंतर सहा महिने माहेरी राहिली. मुलीच्या बारशाची राहुलला वेळेवर माहिती दिली. राहुलला सोडून माहेरी निघून गेल्यानंतर निताने तडजोडीचे काहीच प्रयत्न केले नाही. तसेच, राहुलकडून झालेल्या तडजोडीच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. ती दहा वर्षावर काळापासून विभक्त रहात आहे. उच्च न्यायालयाने या सर्व बाबी लक्षात घेता निताला दिलासा देण्यास नकार दिला.