लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नी स्वत:हून विभक्त झाली नाही. त्यामुळे पतीला घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला.प्रकरणातील पती रामटेक तालुक्यातील भोजापूर तर, पत्नी लकडगंज, नागपूर येथील रहिवासी आहे. पत्नी स्वत:हून विभक्त झाल्यामुळे घटस्फोट मिळावा, अशा मागणीसह पतीने सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका कुटुंब न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे आणि श्रीराम मोडक यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता कुटुंब न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून पतीचे अपील फेटाळून लावले. पत्नी स्वत:हून विभक्त झाली हे पतीला सिद्ध करण्यात अपयश आले. त्यामुळे पतीला कायद्यानुसार घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.प्रकरणातील दाम्पत्याचे हिंदू पद्धतीने लग्न झाले आहे. पत्नी सुमारे दहा वर्षे सासरी राहिली. तिचा स्वभाव क्रूर असून ती नेहमीच भांडण करत होती. शिवीगाळ करत होती. तिला समजावण्याचे अनेक प्रयत्न केले तरी, तिच्या स्वभावात काही सुधारणा झाली नाही. दरम्यान, तिने मुलाला जन्म दिला. ती मुलाला पतीपासून वेगळे ठेवत होती. एक दिवस तिने काही कारण नसताना पतीचे घर सोडले आणि पतीने अनेकदा विनंती केल्यानंतरही परत आली नाही, असे अपीलमध्ये नमूद करण्यात आले होते. परंतु, पतीला त्याचे दावे पुराव्यासह सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला.