नागपूर : एकत्र राहण्यास नकार दिल्याने पतीने भरदिवसा रस्त्यातच आपल्या पत्नीची हत्या केली. दोन लहानग्या मुलांसमोर त्याने पत्नीच्या पोटात चाकू मारला. घटना बुधवारी दुपारी वर्धा मार्गावरील शिवणगाव परिसरात घडली. २४ वर्षीय अंकिता सचिन भगत असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी सचिन भगत याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे दोन्ही मुले हादरली असून, त्यांच्या डोक्यावरील आईचे छत्रच हरविले आहे.
सचिन हा मूळचा चंद्रपूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर चंद्रपुरातही गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. ८ वर्षांपूर्वी त्याचा अंकितासोबत विवाह झाला होता. त्यांना सहा वर्षांचा श्लोक आणि तीन वर्षांचा श्रावण असे दोन मुले आहेत. सचिनला दारूचे व्यसन आहे. अंकिता आणि सचिनमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. सचिनच्या दारू पिण्याने आणि तो कोणतेही काम न करत असल्याने अंकिता त्रस्त झाली होती. तिने फेब्रुवारीमध्ये सचिनला सोडले आणि पांढराबोडी येथे आईसोबत राहू लागली. सचिन दोन्ही मुलांसह बुटीबोरी येथे राहात होता.
काही दिवसांपूर्वीच मोठा मुलगा श्लोक याला पत्नीच्या ताब्यात देण्यात आले. तो लहान मुलगा श्रावणसोबत राहू लागला. सचिन इकडून- तिकडून पैसे मागून आपला उदरनिर्वाह करत होता. अंकिता सुरुवातीला ढाब्यावर काम करायची. नुकतीच शिवणगाव येथील एका सिमेंट रस्ता बांधकाम कंपनीत ती कामाला लागली होती.
मंगळवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास सचिन पत्नीचा शोध घेत शिवणगाव येथे पोहोचला. अंकिता ही शिवणगाव बसस्थानकाजवळ आपली ड्यूटी करत होती. मोठा मुलगा श्लोक तिच्यासोबतच होता. सचिनने लहान मुलगा श्रावणला सोबत आणले होते. त्याने अंकिताला सोबत येण्यास सांगितले. सचिनच्या छळामुळे हैराण झालेल्या अंकिताने सोबत येण्यास नकार दिला. सचिनने मुलगा श्लोकला त्याच्याकडे सोपविण्यास सांगितले. दरम्यान, दोघांमध्ये वाद सुरू झाला. शेजारीच मजूर काम करत होते. पती-पत्नीमधील वाद लक्षात घेऊन मजुरांनी सचिनकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, त्याने अंकितावर चाकूने हल्ला केला. पोटात वार झाल्याने अंकिता जागीच कोसळली. सचिन तेथून पळून गेला. मजुरांनी लोकांच्या मदतीने अंकिताला रुग्णालयात नेले. तिला तेथे मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी, सोनेगावचे पोलीस निरीक्षक डी. डी. सागर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकाबंदी केली व काही वेळातच सचिनला पकडले.
चारित्र्यावरही होता संशय
कामाचा किंवा ड्रायव्हिंगचा अनुभव असूनही सचिन पत्नीवर अवलंबून होता. अंकिता मोलमजुरी करून घर चालवत होती. असे असतानाही त्याला सचिनचा छळ सहन करावा लागत होता. सचिन तिच्या चारित्र्यावरही संशय घेत असे. अंकिताच्या आईनेही याला दुजोरा दिला आहे.
निष्पाप डोळ्यांनी पाहिला आईचा मृत्यू
डोळ्यांसमोर वडिलांनीच आईची हत्या केल्याने अंकिताच्या दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला आहे. तीन वर्षांच्या श्रावणला काहीच भान नाही. या घटनेनंतर आई-वडील नसल्यामुळे त्याचे रडणे थांबत नाही. पोलिसांनी अंकिता आणि सचिनच्या कुटुंबीयांना मुलांची काळजी घेण्याची विनंती केली आहे.