लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घटस्फोट होण्यापूर्वी दुसरे लग्न करण्यास आसुसलेली पत्नी क्रूरच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून पतीला घटस्फोट मंजूर केला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. (Wife who got married for the second time before getting divorced is cruel! High Court observation)
या प्रकरणातील दांपत्य अकोला येथील रहिवासी आहेत. पत्नी क्रूरपणे वागत असल्यामुळे पतीने घटस्फाेट मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने पतीला घटस्फोट देण्यास नकार देऊन त्याला केवळ एक वर्षाकरिता पत्नीपासून विभक्त राहण्याची परवानगी दिली. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर करण्यात आले. पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानंतर पत्नीने पती व त्याच्या नातेवाइकांविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. तसेच, पोलीस ठाण्यातही छळाची तक्रार नोंदवली; परंतु तिने वैवाहिक अधिकार परत मिळविण्यासाठी याचिका दाखल केली नाही. तसेच तिने घटस्फोटाचा निर्णय अंतिम होण्यापूर्वीच दुसऱ्या लग्नासाठी प्रयत्न करणे सुरू केले. त्याकरिता तिने दोन वैवाहिक वेबसाइटवर वैयक्तिक माहिती अपलोड केली. त्यावरून तिची पतीसोबत राहण्याची व सुखाने संसार करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता कुटुंब न्यायालयाने पतीला घटस्फोट नाकारून चूक केली, असे उच्च न्यायालयाने पतीला दिलासा देताना नमूद केले.
पत्नीवर गंभीर आरोप
पत्नी पतीला बाहेरगावची नोकरी सोडून अकोला येथे राहण्याचा आग्रह करीत होती. आई होण्यास नकार देत होती. एक दिवस ती अचानक सर्व दागिने घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने व तिच्या वडिलांनी भांडण करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली असे गंभीर आरोपही पतीने केले होते.