लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी पुरेशी मासिक रक्कम मिळणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून पत्नीची पोटगी १८०० रुपयावरून ३ हजार रुपये महिना केली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ११ एप्रिल २०१६ रोजी कुटुंब न्यायालयाने नागपूर येथील पत्नी कांता यांना १८०० रुपये मासिक पोटगी मंजूर केली होती. वाढत्या महागाईमुळे या रकमेत खर्च भागविणे कठीण झाल्यामुळे कांता यांनी २०१७ मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल करून पोटगी वाढवून ५ हजार रुपये करण्याची मागणी केली होती. पती अण्णासाहेब सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असून, त्यांना १५ हजार रुपये निवृत्ती वेतन आणि ५ हजार रुपये घरभाडे मिळते. याशिवाय त्यांना मोठ्या रकमेचे निवृत्ती लाभही मिळाले आहेत. कायद्यानुसार, पती ज्या दर्जाचे जीवन जगतो, त्याच दर्जाचे जीवन जगण्याचा पत्नीला अधिकार आहे, असे कांता यांचे म्हणणे होते. त्यावर अण्णासाहेब यांनी उत्तर सादर करून कांता यांचा दावा अमान्य केला. परंतु, न्यायालयाने रेकॉर्डवरील विविध पुरावे व कायदेशीर तरतुदी लक्षात घेता, कांता यांना १ जानेवारी २०२१ पासून ३ हजार रुपये मासिक पोटगी अदा करण्यात यावी, असा आदेश दिला. तसेच, याचिका खर्चापोटी ५ हजार रुपये मंजूर केले. ही रक्कमही अण्णासाहेब यांनाच द्यायची आहे.