लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती भांडणातून पत्नीची हत्या करणाऱ्या दिलीप खापेकरने एक दिवसापूर्वीच पत्नीच्या हत्येचा प्लॅन केला होता. त्याच उद्देशाने पत्नी अनिताला गांधीसागर येथील पागे उद्यानात भेटण्यास बोलविले होते. लोकांची गर्दी पाहून त्याचा प्लॅन फसला. क्राईम सिरियल पाहूनच दिलीपने पत्नीची हत्या केल्याची माहिती आहे. कोराडी पोलिसांनी बुधवारी दिलीपविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.प्राप्त माहितीनुसार, पाचपावली शंकर मंदिराजवळील रहिवासी दिलीप खापेकरने (४५) मंगळवारी सायंकाळी पत्नी अनिता खापेकरची (३५) गळा चिरून हत्या केली होती. गळा चिरल्यानंतर त्याने अनिताला विष पाजले होते. त्यानंतर स्वत:ही विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. विष कमी प्राशन केल्यामुळे दिलीप वाचला. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप खूनशी स्वभावाचा होता. तो अनिताला त्रास द्यायचा. अनिताला १८ वर्षांची मुलगी तनू आणि मुलगा तुषार १६ वर्षांचा आहे. अनिताने दिलीपची पाचपाचली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी घरगुती विवाद समजून प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर दिलीप अनिताला आणखी त्रास देऊ लागला. पतीच्या स्वभावात बदल होत नसल्याचे पाहून अनिता मुलांसह मावशीकडे राहायला गेली. त्यामुळे तो संतप्त झाला. अनिता घरखर्चासाठी स्वयंपाकीचे काम करीत होती. दिलीप अनिताला धडा शिकविण्याच्या संधीच्या शोधात होता. हत्या करण्यासाठी तो क्राईम सिरियल पाहत होता.माहितीनुसार दिलीपने सोमवारीच अनिताच्या हत्येची योजना तयार केली होती. त्यानुसार त्याने अनिताला गांधीसागर येथील पागे बगीच्यात बोलविले होते. त्याच ठिकाणी हत्या करण्याचा त्याचा इरादा होता. अनिता त्याला भेटण्यासाठी बगीच्यात आली. जवळपास एक तास दोघे सोबत होते. बगीच्यात गर्दी असल्यामुळे दिलीपला हत्या करता आली नाही. मंगळवारी गुरुपौर्णिमा होती. त्याने अनिताला कोराडी येथील जगदंबा मंदिरात दर्शनासाठी नेले. योजनेनुसार त्याने अनिताला चर्चेसाठी स्मृतिनगर येथील झुडपात नेले. त्या ठिकाणी शस्त्राने तिचा गळा कापून हत्या केली. हत्येनंतर त्याने तिला विष पाजले आणि स्वत:ही प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी दोघांना मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अनिताला मृत घोषित केले. पोलिसांनी मंगळवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण बुधवारी दिलीपवर खुनाचा गुन्हा नोंदविला.मुलीच्या जीवाला धोकासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप मुलीवरही नाराज होता. काही दिवसांपूर्वी दिलीप दगड घेऊन तिला मारण्यासाठी आला होता. पण त्याला तनू न दिसल्याने तिची हत्या करण्याची धमकी दिली होती. तनूच्या जीवाला धोका असल्याची शंका एका नातेवाईकाने व्यक्त केली. तनू हुशार मुलगी आहे. घरगुती भांडणानंतरही तिने बारावीत ९२ टक्के गुण मिळविले होते. १५ दिवसांपूर्वीच ती एका खासगी फर्ममध्ये नोकरीवर रुजू झाली होती.