राकेश घानोडे ल्ल नागपूरमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे अशी ठाम भूमिका एका प्रकरणात व्यक्त केली आहे. तसेच, पत्नीला १५०० रुपये पोटगी देण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती अमान्य करून पतीला दणका दिला आहे.न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला आहे. पत्नीला नोकरी मिळाली आहे. यामुळे तिला पोटगी देता येणार नाही असा दावा करून पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. सन्मानाने जीवन जगण्यासाठी पोटगीची रक्कम पुरेशी ठरत नसल्यास पत्नी नक्कीच नोकरी शोधू शकते. पत्नीस नोकरी मिळाल्यास, ही बाब पतीकरिता पोटगीचा आदेश परत घेण्यासाठीचे कारण ठरू शकत नाही. पत्नीची नोकरी अस्थायी स्वरूपाची असून तिला कोणत्याही क्षणी कमी केले जाऊ शकते. पत्नी तिच्या मूळ गावापासून १५० किलोमीटर लांब असलेल्या शहरातील महाविद्यालयात नोकरी करीत आहे. तिने राहण्यासाठी भाड्याचे घर घेतले आहे. पत्नीसोबत रहात असलेल्या मुलाला दमा आहे. मुलाच्या उपचारावर मोठा खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पोटगीचा आदेश मागे घेतला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आहे.
पत्नीला सन्मानाने जगण्याचा अधिकार
By admin | Published: September 02, 2015 4:29 AM